पुणे अपघात प्रकरणात धक्कादायक माहिती समोर,आरोपीने दारु पिऊन गाडी चालवल्याचं स्पष्ट

0
12

जामिनाविरोधात पुणे पोलीस सत्र न्यायालयात

पुणे :- बेदरकारपणे आलिशान पोर्शे कार चालवून दोघांना चिरडणारा पुण्यातील अल्पवयीन बिल्डरपुत्र वेदांत अगरवालला अवघ्या 15 तासात जामीन मिळाल्याने संतापाची लाट उसळली आहे.दोघांच्या मृत्युला कारणीभूत ठरलेल्या वेदांत अगरवालला जामीन मंजूर करताना न्यायालयाने घातलेल्या अटी अतिशय आश्चर्यचकारक असल्यानेही भूवया उंचावल्या आहेत.सर्वच स्तरातून सडकून टीकेचा मारा सुरु झाल्यानंतर आता पुणे पोलिसांनी पत्रकार परिषद घेत आतापर्यंत केलेल्या कारवाईचा तपशील सादर केला आहे. पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी माहिती दिली.

पुणे अपघातात आरोपीने नशेतच पोर्शे कार चालवल्याचं स्पष्ट!

पुण्यात झालेल्या भीषण अपघातात अनिस अवधिया आणि अश्विनी कोस्टा (रा. मध्य प्रदेश) नावाच्या तरुण तरुणीला चिरडले. यामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला. यानंतर आता पोलिसांनी सुद्धा वेदांत अगरवालने दारुच्या नशेत पोर्शे कार चालवल्याचे स्पष्ट असल्याचे सांगितले. अमितेश कुमार म्हणाले की, आरोपी अल्पवयीन असल्याने त्याला जामीन मिळाला आहे. मात्र, आम्ही याविरोधात सत्र न्यायालयात याचिका दाखल करणार आहोत. मुलाचे वडील आणि त्याला दारु देणाऱ्या पब मारकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कल्याणी नगर, कोरेगाव पार्क भागातील पब आणि बारवर कारवाई करण्यासाठी अबकारी विभागासासोबत काम करण्यात येईल.

अमितेश कुमार यांनी सांगितले की, कोणालाही वाचवण्यात येणार नाही. विना नंबर प्लेट गाडी देणाऱ्या डीलरवर देखील कारवाई करण्यात येईल. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलिस आयुक्तांकडे सोपविण्यात आला आहे. पोलिस ठाण्यातील सीसीटीव्ही फुटेजचाही तपास करण्यात येईल. कोणी राजकीय दबाव आणला का आहे का? यातून समजेल. ते म्हणाले की, या प्रकरणात कोझी बार आणि ब्लॅक बार या दोन बार चालकांवर कारवाई करण्यात येणार आहे. हा मुलगा खरंच अल्पवयीन आहे का? याचा तपास त्याच्या शाळेत जाऊन करण्यात येत आहे. हा मुलगा दारु पिऊन गाडी चालवत होता हे स्पष्ट आहे.

बिल्डराने आपल्या पोरासाठी मध्यरात्रीच ‘बळाचा’ वापर करत आपला मुलगा कार चालवत नसल्याचे भासवण्याचा प्रयत्न केला होता. तसेच ड्रायव्हरला त्याठिकाणी उभा केला होता. मात्र, प्रत्यक्षदर्शीनी केलेल्या धुलाईने आणि दिलेल्या माहितीने भांडाफोड झाला होता.

तसेच पत्रकार परिषदेत पोलीस आयुक्त अमितेश कुमार बोलताना पुढे म्हणाले की,कल्याणीनगरमध्ये रविवारी पहाटे झालेल्या अपघातात इंजिनिअर तरुण तरुणीचा मृत्यू झाला.अल्पवयीन मुलासह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये अल्पवयीन मुलाचे वडील, हॉटेलचे मॅनेजर आणि त्याला दारु पुरवणाऱ्यांसह पाच जणांवर विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणाचा पुणे पोलीस अधिक तपास करत आहेत.अपघात प्रकरणी अल्पवयीन मुलाच्या वडिलांवर, दोन हॉटेल चालकांवर मिळून तीन गुन्हे दाखल झाले आहेत. पोलीस आयुक्तांनी सांगितलं की, “पुणे पोलिसांनी गांभीर्याने या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात ३०४ अंतर्गत कलम लावले आहेत. हा आरोपी अल्पवयीन आहे त्यामुळे त्याला निरीक्षणगृहात ठेवण्यासाठी मागणी केली होती. मात्र, आमची मागणी फेटाळली आहे. या विरोधात आम्ही सत्र न्यायालयात अपील करणार आहोत.”

वडिलांनी दिली गाडी,दारु प्यायलाही परवानगी

पालकांनी एवढी महागडी गाडी दिली,त्याला दारू पिण्यास परवानगी दिली म्हणून त्याच्या विरोधात पण गुन्हा दाखल केला आहे. वडील आणि मॅनेजर याच्या विरोधात वेगळा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात पोलिसांकडून कोणतीही कसूर सोडली नसून कायद्यानुसार सर्व प्रकिया पूर्ण करण्यात आलीय. एसीपी दर्जा अधिकारी या केसचा तपास करत आहे. आरोपीला शिक्षा व्हावी यासाठी आमचा प्रयत्न असल्याचंही अमितेश कुमार यांनी सांगितलं.

दारु पीत असल्याचं फूटेज

पब आणि बार याच्या वेळेची आम्ही अंमलबजाणीबाबत काम करत आहोत. अनेक सुधारण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यासाठी अधिकाऱ्यांसोबत सोबत बैठक झाली आहे. ट्रॅफिक, ड्रिंक अंड ड्राईव्ह बाबत सगळी चर्चा झाली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागासोबत पण चर्चा सुरू आहे. एसीपी दर्जाच्या अधिकाऱ्याकडे तपास सोपवला आहे. आरोपीला शिक्षा होईल यासाठी प्रयत्न करू. आरोपीने दारू प्यायली होती, दारु पिताना सीसीटीव्ही फूटेज मिळालं. पुरावे आमच्याकडे आहेत असंही पोलिसांनी स्पष्ट केलं.

पब आणि बारवर कारवाई होणार?

अपघाताचा तपास गुन्हे शाखेकडे पाठवला आहे. सीसीटीव्ही फूटेज गोळा केलं असून तपास केला जात आहे. पोलिसांनी कारवाई केली नाही असं नाही, पोलिसांना जे कायदेशीर अधिकार आहेत त्यानुसार कारवाई केली जात आहे. कल्याणीनगर परिसर आणि पुण्यात जे पबचे नियम आहेत. रात्री उशिरापर्यंत चालू राहतात त्याबद्दल अनेकदा कारवाई झालीय. पबच्या बाहेर घडणाऱ्या गोष्टी, कमी वयाच्या मुलांना मद्य पुरवठा करण्याच्या मुद्द्यांवर आमची वरिष्ठ अधिकाऱ्यांशी आणि संबंधित विभागांसोबत चर्चा झालीय. त्यांच्यावरही कारवाई केली जाईल.

राजकीय हस्तक्षेप नाही

अपघातानंतर बिल्डरचा मुलगा असल्याने या प्रकरणात राजकीय हस्तक्षेप झाल्याची चर्चा आहे. याबाबत विचारले असता पोलीस आयुक्तांनी असं काहीही घडलं नसल्याचं सांगितलं. ते म्हणाले की, पोलिसांनी कायद्यानुसार काम केलं. मी स्पष्ट सांगेन की पोलिसांकडे जे अधिकार होते त्याचा वापर केला. कोणत्याही प्रकारचा दबाव नाही, दबावाच पोलिसांनी काम केलं नाही यासाठी पब्लिक डिबेटला तयार आहे. कोणताच दबाव नाही, हस्तक्षेप नव्हता असंही सांगितलं.

गाडी कुणाच्या नावावर, डीलरवर कारवाई होणार?

गाडीला नंबर प्लेट नव्हती, कोणी विकली आणि विना नंबर प्लेटची शोरूममधून कशी बाहेर आली? कधीपर्यंत टेम्पररी नंबर प्लेट होती? नंबर प्लेट असेल तर मग नंबर प्लेटशिवाय कशी चालवली? याचा तपास केला जात आहे. गाडी त्याच्या वडिलांच्या नावावर होती अशी माहिती पोलिस आयुक्तानी दिली.
पोर्श टायकन किंमत

पोर्श कार लोकांना आलिशान अनुभव देतात. या कारच्या पॉवर आणि फीचर्समुळे या कारची किंमत करोडो रुपयांच्या घरात जाते. पोर्श टायकनची एक्स-शोरूम किंमत 1.61 कोटी रुपयांपासून सुरू होते आणि 2.44 कोटी रुपयांपर्यंत जाते.