खासदारांच्या प्रश्नावर सरकार सकारात्मक विचार करणार-फडणवीस

0
13

मुंबई – केंद्राकडे प्रलंबित असलेल्या राज्याच्या प्रश्नांवर “सह्याद्री‘ अतिथिगृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होऊन त्यात अशा महत्त्वपूर्ण प्रश्नांचा गांभीर्यपूर्वक पाठपुरावा करण्याचे ठरले.यावेऴी आम्ही शासनाच्या विविध विभागांना मागणी, सूचनांची पत्रे देतो पण त्यांचे उत्तर देण्याचे सौजन्यही दाखविले जात नाही, अशी तक्रार राज्यातील सर्वपक्षीय खासदारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. त्यावर, खासदारांच्या पत्रावर काय कार्यवाही शासनाने केली हे त्यांना दोन महिन्यांच्या आत कळविले जाईल, असे आश्वासन फडणवीस यांनी दिले.
या बैठकीस लोकसभा आणि राज्यसभेतील राज्याचे खासदार उपस्थित होते. बैठकीस केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री पीयूष गोयल, केंद्रीय खते आणि रसायन राज्यमंत्री हंसराज अहीर, केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री रावसाहेब दानवे त्याचप्रमाणे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, खासदार शरद पवार यांच्यासह भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसच्या खासदारांची उपस्थिती होती. या खासदारांनी विविध प्रश्नांवर चर्चा केली. ब्रिमस्टोवॅड, अपारंपरिक ऊर्जा, मुंबई उपनगर रेल्वेशी संबंधित प्रश्न, मुंबई विकास योजनेत केंद्राचा निधी मिळणे, परवडणारी घरे, मराठवाड्यातील दुष्काळ, कोल्हापूरला कोकण रेल्वेने जोडणे, अतिरिक्त दुधाचा प्रश्न, कापूस हमी भाव, मेट्रोचे जाळे, आरोग्य यंत्रणा, इंदू मिल जमिनीवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रस्तावित स्मारक अशी विविध विषयांवर चर्चा होऊन केंद्राकडे याचा पाठपुरावा सातत्याने करण्याचे ठरले. महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न, त्याचप्रमाणे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त करून देणे, कोस्टल रोड अशा प्रश्नांवरही चर्चा झाली.
खासदारांच्या विभागनिहाय बैठका
राज्यातील खासदारांच्या मागण्या तसेच प्रलंबित प्रश्न लक्षात घेता खासदारांच्या विभागनिहाय बैठका घ्याव्यात, अशी काही खासदारांची मागणी मुख्यमंत्र्यांनी मान्य केली. त्याचप्रमाणे खासदारांच्या आणि सर्वच लोकप्रतिनिधींच्या पत्रांना तातडीने उत्तरे गेली पाहिजेत, असे निर्देश देण्यात येतील, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.