पानसरे हत्येप्रकरणी समीर गायकवाडसह अन्य तिघांना अटक

0
15

विशेष प्रतिनिधी
कोल्हापूर, दि. १६ – कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी सांगली शहर परिसरातून एका तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. कोल्हापूर व सांगली पोलिसांच्या पथकाने ही कारवाई केली असून समीर गायकवाड असे या तरुणाचे नाव आहे. समीर गायकवाड १९९८ पासून सनातन संस्थेशी संबंधित असल्याचे कोल्हापूरचे पोलीस महानिरीक्षक संजयकुमार यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत सांगितले. गायकवाडचे संपूर्ण कुटुंबच सनातन संस्थेशी संबंधित असल्याचे पोलीसांनी सांगितले. पोलीसांनी समीरला कोल्हापूर येथील कोर्टात हजर केले असता न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.चौकशी दरम्यान गायकवाडकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे एसआयटीने मुंबई,पुणे व गोवा येथे चौकशी करुन अन्य तिघांना अटक केली आहे.यामध्ये एका महिलेच समावेश आहे.विशेष म्हणजे काॅ.पानसरेंच्या हत्येला आज बुधवारला सात महिने पुर्ण झाले आहेत.गायकवाडच्या सांगली येथील घराची सध्या झळती सुरु असून गोव्यातील एका घराची सुध्दा झळती सुरु आहे

कॉम्रेड गोविंद पानसरे आणि त्यांच्या पत्नी उमा 16 फेब्रुवारी रोजी सकाळचा फेरफटका मारल्यानंतर घरी परतत असताना यांच्यावर दोघा जणांनी बंदुकीतून गोळीबार केला होता. या हल्ल्यात पानसरे दांपत्य गंभीर जखमी झाले होते. त्यानंतर उपचारांदरम्यान पानसरे यांचे निधन झाले. पानसरे यांच्यावरील भ्याड हल्ल्याचा अवघ्या शहराने दैनंदिन व्यवहार बंद ठेवून निषेध नोंदविला.
संबंधित आरोपीस सांगली शहर परिसरातून ताब्यात घेतले आहे. कोल्हापूर आणि सांगली पोलिसांनी संयुक्तपणे ही कारवाई केली आहे. गायकवाड याच्यावर इतर काही गुन्हे आहेत का, सराईत गुन्हेगार आहेत का याबद्दल पोलिस तपास करणार आहेत. प्राथमिक तपास केल्यानंतर याबाबत अधिकृतपणे माहिती देण्यात येईल पोलिसांच्या वतीने सांगण्यात आले.

समीर गायकवाडचे फोन कॉल्स तपासूनच त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. समीर गायकवाड हा अट्टल गुन्हेगार असून, ज्या दिवशी पानसरेंवर हल्ला झाला, त्या दिवशीचे फोन कॉल्स तपासण्यात आले. याशिवाय समीरचे सुमारे २ कोटी फोन कॉल्स तपासूनच पोलिसांनी ही कारवाई केल्याचे सांगण्यात येत आहे.

समाजपुरुषावर भ्याड हल्ला झाल्याच्या या घटनेचा सर्व स्तरांतून निषेध करण्यात आला. अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर कोल्हापूर ‘टार्गेट‘ होते याची माहिती इंटेलिजन्स ब्युरो (आयबी)ने गृह खात्याला पुरविली होती, असा गौप्यस्फोट भारतीय कामगार पक्षाचे सचिव अखिलेश गौड यांनी येथे केला होता. पानसरे यांच्यावर हल्लेखोरांनी रिव्हॉल्व्हर मधून ‘पॉइंट 32‘च्या गोळ्या झाडल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले होते. यावर गोळीने विचार मारता येतात का, असा सवाल हमीद दाभोलकर यांनी उपस्थित केला.

दाभोलकर, पानसरे तपासात गांभीर्याचा अभाव दिसत आहे, असे ताशेरे मुंबई उच्च न्यायालयाने नुकतेच बुधवारी (9 सप्टेंबर) ओढले होते. या दोन्ही प्रकरणांत एकाही आरोपीला अटक झालेली नाही, असे न्यायालयाने म्हटले होते.