33.9 C
Gondiā
Monday, June 8, 2026
Home Top News अनिल देशमुखांच्या घरांवर ‘ईडी’ची धाड;दोन मालमत्तांची अधिकाऱ्यांकडून झाडाझडती

अनिल देशमुखांच्या घरांवर ‘ईडी’ची धाड;दोन मालमत्तांची अधिकाऱ्यांकडून झाडाझडती

0
45

blank

नागपूर – भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे ईडीच्या रडारवर आलेल्या माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपुरातील दोन मालमत्तांवर धाडी टाकण्यात आल्या आहेत.आज रविवारी दि.१८ जुलै रोजी अनिल देशमुख यांच्या नागपूरमधील काटोल आणि वडविहिरा येथील निवासस्थानी ईडीने छापा टाकला. सकाळी आठ वाजता ही कारवाई करण्यात आली. ईडीने आधीच देशमुखांची ४ कोटी २० लाखांची मालमत्ता जप्त केलेली असून, अंमलबजावणी संचलनालयाने काटोल आणि वडविहिरा येथील घरांची झाडाझडती सुरू केली आहे. त्यामुळे देशमुख यांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

पोलीस अधिकारी परमबीर सिंह आणि सचिन वाझे यांनी अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी वसुली करण्यास सांगितले होते, असा आरोप केलेला आहे. आरोपानंतर अनिल देशमुख ईडीच्या रडावर आले. भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली ईडीकडून अनिल देशमुख यांची चौकशी केली जात असून, देशमुख यांची ४ कोटी २० लाख रुपयांची मालमत्ताही जप्त केलेली आहे. ईडीने पुन्हा एकदा देशमुख यांच्या नागपूरमधील दोन घरांवर धाडी टाकल्या आहेत.

नागपूरमधील काटोल आणि वडविहिरा येथील निवासस्थानी ईडीने रविवारी सकाळी साधारणतः आठ वाजताच्या सुमारास धाड टाकली. त्यानंतर दोन्ही घरांची झाडाझडती अधिकाऱ्यांकडून सुरू असून, कारवाईचं वृत्त पसरताच देशमुख यांच्या समर्थकांनी बंगल्याबाहेर मोठी गर्दी केली होती. यावेळी कारवाई विरोधात कार्यकर्त्यांनी घोषणाबाजीही केली.

देशमुख १४ कोटीच्या मालमत्तेचे मालक
अनिल देशमुख हे १४ कोटीच्या संपत्तीचे मालक असल्याचे २०१९ मध्ये दिलेल्या निवडणूक शपथपत्रातील माहितीवरून स्पष्ट होते. देशमुख यांनी २०१९ मध्ये नागपूरच्या काटोल विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. त्यांनी शपथपत्रात दिलेल्या माहितीनुसार त्यांच्याकडे १४ कोटी ६ लाख रुपयांची संपत्ती आहे. त्यात १२.९ कोटी रुपये अचल आणि १.७ कोटी रुपयांची चल संपत्ती आहे. त्यांच्यावर ४.६ कोटींचे कर्जही आहे. देशमुख यांनी दागिन्यांमध्ये २९ लाख २६ हजार रुपयांची गुंतवणूक केली आहे. तर एलआयसीमध्ये २ लाख ९७ हजार रुपयांची गुंतवणूक केली आहे. बाँड, शेअर्स आणि डिबेंचरमध्येही त्यांनी ३ लाख ८६ हजारांची गुंतवणूक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, देशमुख यांच्याकडे १ कोटी १९ लाख रुपयांची शेतजमीन आहे. तर ४ कोटी १५ लाखांची बिगर शेती आहे. नवी मुंबई आणि वरळीत दोन फ्लॅट आहे. एकाची किंमत २ कोटी २३ लाख तर दुसऱ्याची किंमत ५ कोटी २७ लाख आहे.

blank