मोदींना भेटल्यानंतर तेजस्वी यादव म्हणाले – जर झाडे आणि प्राण्यांची गणना होऊ शकते, तर मग जातींची का नाही?

0
74

नवी दिल्ली(वृत्तसंस्था)दि.23ः- बिहारमधील 10 राजकीय पक्षांच्या नेत्यांनी जातीय जनगणनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत भेट घेतली. यामध्ये बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि आरजेडी नेते तेजस्वी यादवदेखील उपस्थित होते. पंतप्रधान मोदींच्या बैठकीनंतर या दोन्ही नेत्यांनी एकत्र पत्रकार परिषद घेतली. दरम्यान, नितीश कुमार म्हणाले की, या बैठकीमध्ये आम्ही पंतप्रधान मोदी यांना बिहारमधील जातींबाबत माहिती दिली.

पंतप्रधानांनी आमचे म्हणणे लक्षपूर्वक ऐकले असून आमची मागणी नाकारली नसल्याचे ते यावेळी म्हणाले. देशात जर झाडे, वनस्पती आणि प्राण्यांची गणना होऊ शकते, तर मग जातींची का नाही असा सवाल आरजेडी नेते तेजस्वी यादव यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला.

काय म्हणाले तेजस्वी यादव?
तेजस्वी यादव म्हणाले की, जर देशात झाडे, वनस्पती आणि प्राण्यांची गणना होऊ शकते, तर मग जातींची का नाही? केंद्र सरकारजवळ कोणत्याच जातींची स्पष्ट आकडेवारी नाही. राज्यात कोणत्या जातींचे किती लोक राहतात? डेटांच्या आधार कोणतेही काम करायला सोपं जाईल. राज्यात पहिल्यांदाच सर्व पक्षांनी एकत्र येत विधानसभेत जातीय जनगणना विधेयक पास केले. त्यामुळे मी मुख्यमंत्री नितीश कुमार आणि पंतप्रधान मोदींचेही आभार मानतो. आता आम्ही निर्णयाची वाट पाहत असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत म्हटले आहे.

बैठकीत अनेक पक्षांचा समावेश
या बैठकीत काँग्रेस, HAM, AIMIM, VIP, CPI, CPM, माले आदी पक्षांतील वरिष्ठ नेते उपस्थित होते. विशेष म्हणजे या बैठकीत तेजस्वी यादव यांचादेखील समावेश होता. पंतप्रधान मोदींच्या या बैठकीत जेडीयूचे शिक्षण मंत्री विजयकुमार चौधरी, काँग्रेस नेते अजित शर्मा, सीपीआय (एमएल) नेते मेहबूब आलम, एआयएमआयएमचे अख्तरुल इमान, माजी मुख्यमंत्री आणि एचएएम सुप्रीमो जीतन राम मांझी, व्हीआयपी प्रमुख मुकेश साहनी, सीपीआय नेते सूर्यकांत पासवान आणि सीपीएम नेते उपस्थित होते.