हसन मुश्रीफ यांच्या कुटुंबाकडून तब्बल ‘इतक्या’ कोटींचा घोटाळा; किरीट सोमय्या यांचा गंभीर आरोप

0
45

मुंबई – माजी खासदार आणि भाजप नेते किरीट सोमय्या यांनी काल ठाकरे सरकारमधील दोन मंत्र्यांची पोलखोल करणार, असा इशारा दिला होता. त्यानंतर आज त्यांनी राज्याचे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले आहेत.

हसन मुश्रीफ यांच्या कुटुंबीयांनी कोट्यावधी रूपयांचे घोटाळे केले आहेत. हसन मुश्रीफ आणि कुटुंबीयांनी सरसेनानी संताजी धनाजी साखर कारखान्यामध्ये 100 कोटीहून अधिक भ्रष्टाचाराचा पैसा पार्क केला, मी हे जबाबदारीने सांगत आहे, असं किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे. याबाबत मी अधिकृतपणे ईडीकडे तक्रार करणार असल्याचं देखील किरीट सोमय्या यांनी सांगितलंय.

बोगस कंपन्याद्वारे मोठ्या प्रमाणावर मनी लाँडरिंग करणं, बेनामी संपत्ती विकत घेणं, असे गंभीर आरोप किरीट सोमय्या यांनी केले आहेत. माझ्याकडे याचे 2700 पानी पुरावे आहेत आणि ते सर्व पुरावे मी इनकम टॅक्स विभागाला दिले आहेत, असंही सोमय्या यांनी सांगितलं आहे.दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून किरीट सोमय्या हे महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांवर आरोप करताना दिसत आहेत.

सोमय्या यांचे आरोप हसन मुश्रीफ यांनी फेटाळून लावले 100 कोटींच्या अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार

किरीट सोमय्या यांनी केलेल्या आरोपांचे खंडण करण्यासाठी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषद घेतली. सोमय्या यांनी माझ्यावर केलेले मनी लॉन्ड्रींगचे आरोप खोटे आहेत. माझ्या मालकीच्या सर्व कंपन्यांची माहिती संकेतस्थळावर उपलब्ध आहे. माझ्यावर याआधी आयकर विभागाची धाडी पडल्या होत्या, पण त्यामध्ये काहीच सापडलं नाही, असं म्हणत मुश्रीफांनी आरोपांचे खंडण केलं आहे.

ज्यादिवशी कारखान्याचे लायसन्स मिळालं त्यादिवशी लोकांनीच 17 कोटी रूपये जमा केले. मी येणाऱ्या दोन आठवड्यात कोल्हापुरात किरीट सोमय्या यांच्यावर फौजदारी कारवाई करत 100 कोटींच्या अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार आहे, असं मुश्रीफ यांनी म्हटलं आहे. तसेच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर देखील आपण रस्ते घोटाळ्याच्या चौकशीसाठी तक्रार लाचलुचपत विभागाकडे करणार असल्याचं मुश्रीफ यांनी सांगितलं.

दरम्यान, किरीट सोमय्यांना काहीही माहिती नाही. सोमय्या यांना चंद्रकांत पाटील आणि समरजीत घाटगे यांनीच माहिती दिली आहे. सोमय्या यांनी कोल्हापूरमध्ये येवून माहिती घ्यायला हवी होती. तसेच त्यांना हवी त्या ठिकाणी तक्रार करावी, असंही मुश्रीफ म्हणाले आहेत.