सणासुदीच्या काळात भेसळखोरांवर कडक कारवाई करा : डॉ. राजेंद्र शिंगणे

0
11

आकस्मिक भेटी व धाडी वाढवा, भेसळ नियंत्रण, ऑक्सीजन व औषधांची उपलब्धता हेच उद्दिष्ट ठेवण्याचे निर्देश

नागपूर दि. १३ : दूध, तेल, मिठाई व अन्य खाद्यपदार्थांमध्ये भेसळ करणारे हे असामाजिक तत्वच आहेत. त्यामुळे जनतेच्या आरोग्याशी खेळणाऱ्या भेसळखोरांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी आज येथे दिले. कोरोनाच्या संभाव्य लाटेसाठी ऑक्सीजन व औषधांची उपलब्धता याकडेही लक्ष वेधण्याचे त्यांनी सांगितले.
डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी आज नागपूर येथे अन्न व औषध विभागाच्या नागपूर विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. यावेळी त्यांनी सणासुदीमध्ये नागरिकांच्या आरोग्याची काळजी अन्न व औषधी विभागाने घ्यावी. या विभागाचे या काळातील हे सर्वात मोठे दायित्व असून भेसळ करणारे पकडल्या गेले पाहिजे. त्यामुळे नागरिकांकडून आलेल्या तक्रारी, खबरीकडून मिळालेल्या माहितीचा आधार घेत अशा असामाजिक तत्त्वांवर अंकुश लावणे, विभागाचे काम आहे. नागपूर विभागात अशा प्रकारच्या कारवाईची संख्या वाढणे आवश्यक असून त्यासाठी सर्व अधिकाऱ्यांनी पुढील महिन्याचे नियोजन करण्याचे निर्देश आढावा बैठकीत दिले.
यासोबतच नागपूर विभागात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये ऑक्सिजनची मोठ्या प्रमाणात मागणी वाढली होती हे लक्षात घेऊन ऑक्‍सिजनचा साठा व त्याचा सुलभ, सहज नियमित पुरवठा याकडे लक्ष वेधण्याचे सांगितले. ऑक्सीजनचा साठा व त्यासाठी उपलब्ध असलेल्या पायाभूत सुविधा बाबतही त्यांनी माहिती घेतली. राज्य शासनाने या संदर्भात साठवणुकीचे सूत्र ठरविले असून त्याप्रमाणे प्रत्येक जिल्ह्यात साठा झाला पाहिजे. स्थानिक प्रशासनाच्या मदतीने हे कार्य करण्याचे त्यांनी सांगितले. बेकायदा रेमडिसीवीर इंजेक्शन विक्री व साठा पकडून नागपुरात कोरोना लाटेदरम्यान कारवाई करण्यात आली. अशा धडक कारवाईचे प्रमाण विभागातील अन्य जिल्ह्यांमध्ये देखील वाढणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. म्यूकरमायकोसिस व अन्य आजारामध्ये आवश्यक असणाऱ्या औषधांच्या उपलब्धतेचा त्यांनी आढावा घेतला. औषधांचा तुटवडा नागपूर विभागात जाणवणार नाही, यासाठी योग्य नियोजन करण्याचे त्यांनी सुचविले.
भंडारा,गोंदिया, नागपूर, चंद्रपूर, वर्धा गडचिरोली या सहाही जिल्ह्यामध्ये अन्न प्रशासन विभागाने हॉटेल व्यावसायिक व अन्नपदार्थ निर्मितीमध्ये कार्य करणाऱ्या व्यावसायिकांच्या किती बैठका घेतल्या याचा आढावा त्यांनी घेतला. काही ठिकाणी बैठका घेतल्या नसल्याचे दिसून आले यावर त्यांनी पुढील आठवड्यात सर्व बैठका पूर्ण करण्याचे निर्देश दिले. भेसळीशिवाय उत्तम दर्जाचे अन्न पदार्थ, त्यावर निर्मिती आणि एक्सपायरी संदर्भातील तारखा छापल्या गेल्या अथवा नाही याची खातरजमा करणे या विभागाचे प्रथम कर्तव्य आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात आकस्मिक भेटी वाढवा. तपासण्या वाढवा असे त्यांनी स्पष्ट केले.
नागपूर विभागातील अनेक जिल्ह्यांना अन्य राज्याच्या सीमा लागून आहेत. याठिकाणी महाराष्ट्रात प्रतिबंधित असणाऱ्या अनेक वस्तू आयात निर्यात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सुगंधी तंबाखू, सुपारी याबाबत जागरूक असणे गरजेचे आहे. कॅन्सर सारख्या गंभीर आजाराचे प्रकार वाढत असून खर्रा, मावा यामध्ये वापरल्या जाणाऱ्या सुगंधित तंबाखू मुळे आरोग्याला धोका संभवत आहे. त्यामुळे अशा ठिकाणी प्रत्यक्ष मैदानात उतरून अधिकाऱ्यांनी कारवाई करावी, प्रत्येक जिल्ह्यात प्रतिबंधात्मक प्रचार-प्रसार व बैठकांची संख्या वाढविण्यात यावी असेही त्यांनी सांगितले.
दुधातील भेसळीच्या संदर्भातही या बैठकीत त्यांनी मार्गदर्शन केले. दूध व दुग्धजन्य पदार्थांच्या भेसळीच्या तपासण्या वाढविण्याचे सांगितले. औषध प्रशासन विभागाने नियमित मेडिकल स्टोअर्सची तपासणी करावी, डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय औषधे देण्यास मेडिकल स्टोअर्सला मज्जाव करावा, अशा पद्धतीची औषधी सहज उपलब्ध होत असेल तर मेडिकलवर कारवाई करावी, असेही त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी विभागातील कमी मनुष्यबळाचा संदर्भातील प्रश्न लवकर सुटणार असण्याचे संकेत दिले. या विभागात मोठ्या प्रमाणात भरती करण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.
या बैठकीला नागपूर विभागाचे सहआयुक्त ए. आर. वाने, चंद्रपूरचे सहाय्यक आयुक्त नितीन मोहिते, भंडारा, गडचिरोलीचे ए.पी. देशपांडे, औषधे विभागाचे नागपूर येथील सहाय्यक आयुक्त पी. एम. बल्लाळ, चंद्रपूरचे उ.ग. बागमारे यांच्यासह विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.