मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ‘दी धारावी मॉडेल’ पुस्तकाचे प्रकाशन

0
20

मुंबई, दि. १४ : –  कोरोना रोखण्यात मुंबई महापालिकेने धारावी मॉडेल यशस्वी केले आहे. या यशस्वी प्रयत्नांतील अनुभव, साद्यंत माहितीचा आढावा घेणाऱ्या ‘दी धारावी मॉडेल’ या पुस्तकाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज येथे प्रकाशन करण्यात आले. यावेळी मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा पर्यटन, पर्यावरण व  राजशिष्टाचारमंत्री आदित्य ठाकरे उपस्थित होते.

या पुस्तकाचे लेखक  किरण दिघावकर हे मुंबई महापालिकेचे सहायक आयुक्त आहेत.

वर्षा निवासस्थानी झालेल्या या प्रकाशन प्रसंगी लेखक श्री. दिघावकर यांच्यासह मुंबई महापालिकेचे आय़ुक्त आय. एस. चहल, अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी उपस्थित होते.

लेखक श्री. दिघावकर यांनी या पुस्तकात धारावीमध्ये कोविड-19 विषाणू संसर्ग रोखण्यासाठी महापालिका प्रशासनाने केलेल्या उपाययोजना, प्रयत्नांची मांडणी केली आहे. या उपाययोजनांना जागतिक पातळीवर गौरवले गेले आहे. केंद्र सरकार, जागतिक बँक, जागतिक आरोग्य संघटनेकडून आणि विदेशातही धारावी मॉडेलचे कौतुक केले गेले आहे. धारावी मॉडेल म्हणून ही कार्यपद्धती अन्य देशांमधील अशा दाट लोकवस्तीच्या झोपडपट्टीमध्येही अवलंबण्यात येत आहे. कोविडच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेतही धारावी मॉडेलने आपले नाणे खणखणीत असल्याचे सिद्ध केले आहे.

धारावीतील कोविड व्यवस्थापन करताना श्री. दिघावकर यांना आलेले अनुभव आणि आठवणी यांचे हे पुस्तक स्वरुपातील संकलन आहे. इंग्रजीतील हे पुस्तक लवकरच मराठी आणि इतर भाषांमध्ये अनुवादीत स्वरुपात उपलब्ध होणार आहे. पुस्तक ई- बुक स्वरुपात देखील उपलब्ध करून देण्यात आले आहे.  यामुळे जगाच्या कानाकोपऱ्यातील वाचकांना धारावी मॉडेल विस्तृत स्वरूपात जाणून घेणे शक्य होणार आहे.