तिरोडा तालुक्यातील चुरडीत एकाच कुटूबांतील चौघांची हत्या

0
1017
गोंदिया,दि.21 : तिरोडा तालुक्यात येणाऱ्या चुरडी येथे एकाच कुटुंबातील चौघांची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना आज सकाळी १० वाजता ड्रायव्हर वाहन घेऊन जाण्यासाठी आला असता त्याला घरात ४ मृतदेह दिसून आल्याने उघडकीस आली.एकाच कुटुंबातील चौघांचा खून हा व्यवसायातून झाला की संपत्तीतून झाला हे सांगता येत नाही. आतापर्यंत या खुनाचा उलगडा झाला नाही. एकाच कुटुंबातील चौघांची हत्या करणाऱ्या आरोपींमध्ये अनेक आरोपींचा समावेश असावा असा कयास लावला जात आहे.सदर कुटुंब हे एका राजकीय पक्षाच्या महिला नेत्याचे नातेवाईक असल्याची चर्चा आहे.

गोंदिया जिल्ह्याच्या तिरोडा तालुक्यातील चुरडी येथील ट्रान्सपोर्ट व्यावसायीक रेवचंद डोंगरु बिसेन (५१), मालता रेवचंद्र बिसेन (४५), पौर्णिमा रेवचंद बिसेन (२०), तेजस रेवचंद बिसेन (१७) अशी एकाच कुटुंबातील मृत चौघांची नावे आहेत. रेवचंद डोंगरु बिसेन यांच्याकडे ३ मेटॅडोर व एक ट्रॅक्टर आहे. ते ट्रान्सपोर्टचे काम करतात. रेशनचे धान्य ट्रान्सपोर्ट करण्याचे काम ते करीत होते. २१ सप्टेंबरच्या पहाटे बिसेन कुटुंबियांच्या घरी अज्ञात मारेकऱ्यांनी प्रवेश करून साखर झोपेत असलेल्या लोकांच्या डोक्यावर ट्रॅक्टरच्या स्पेंडलने वार करून ठार केले.

मालता रेवचंद बिसेन ह्या एका बेडवर रक्ताच्या थारोळ्यात पडल्या हाेत्या. मुलगी पौर्णिमा रेवचंद बिसेन (२०) व मुलगा तेजस रेवचंद बिसेन (१७) हे दुसऱ्या बेडवर रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. रेवचंदचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत लटकवून ठेवला. गळफास लावलेला दोर दारातून खिडकीला बांधून ठेवला होता. आरोपींनी नियोजनबध्द पध्दतीने ही हत्या नाही आत्महत्या वाटावी यासाठी रेवचंदचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत लटकवून ठेवला होता.

घटनेची माहिती मिळताच तिरोडाचे ठाणेदार योगेश पारधी, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन यादव व पोलीस अधिक्षक विश्व पानसरे घटनास्थळावर पोचून परिस्थितीचा व घटनेचा आढावा घेतला. मारण्यासाठी वापरण्यात आलेला ट्रॅक्टरचा स्पेंडल हा घटनास्थळपासून घराच्या वऱ्हाड्यांतच १५ फूट अंतरावर फेकलेला आढळला. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी तिरोडाच्या उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

९० वर्षाची म्हातारीच राहिली जिवंत

रेवचंद डोंगरु बिसेन यांच्या आई खेमनबाई डोंगरू बिसेन ह्या आजघडीला ९० वर्षाच्या आहेत. त्या समोरच्या खोलीत आपल्या खाटेवर झोपल्या होत्या. आरोपी मागच्या दारातून आले आणि त्यांनी या चौघांना ठार करुन मागच्याच दाराने पळ काढला तरी खेमनबाई यांना या घटनेचा सुगावा लागला नाही. या खेमनबाई या घटनेची काय माहिती पोलिसांना देतात त्यावरुन आरोपीच्या शोधासाठी पोलीस धागेदोरे जोडणार अशा अंदाज आहे.