मुंबई- मुख्यमंत्रीपद पदरात म पडलेल्याने अस्वस्थ असलेल्या एकनाथ खडसे यांच्या वादग्रस्त वक्तव्याने भाजप सरकारची पंचाईत होऊ लागली आहे. खडसे यांच्या वेगाने पळणाऱ्या घोड्याचा लगाम अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खेचला. यापुढे मुद्याला सोडून बोलू नये, असे गुरुवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत खडसावले.
गेले काही दिवस खडसे यांचा वारू चौफेर उधळला होता. शेतकरी मोबाईलचे बिल भरतात आणि वीजेचे बिल थकवितात, अशा आशयाच्या खडसे यांच्या वक्तव्यावरुनही बराच गदारोळ झाला आहे. खडसे यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याला नाराज न करण्याची भूमिका पक्षाने घेतली होती. पण नाथाभाऊ खडसेंचे जरा अतिच होऊ लागल्याने दिल्लीच्या परवानगीनंतरच बहुधा मुख्यमंत्र्यांनी आपल्या अधिकाराची जाणिव त्यांना करून दिली. कृषीपंपांसाठीचा जळालेला ट्रान्सफॉमर्स बदलायचा असेल, तर शेतकऱ्यांनी थकलेल्या बिलाच्या किमान ७० टक्के रक्कम भरण्याची अट आहे. ती रद्द करुन जो प्रथम मागेल, त्या तत्वावर ट्रान्सफॉर्मर्स मिळाले पाहिजेत, अशी मागणी खडसे यांनी बैठकीत लावून धरली. त्याला उद्योग मंत्री प्रकाश मेहता यांनी विरोध केला आणि ही अट पाळली गेली पाहिजे, असे मत मांडले. त्यावर बराच खल झाला. शेवटी मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करीत खडसे यांना थोपविले आणि धोरणाचा विचार योग्य वेळी केला जाईल. तोपर्यंत वीज वितरण कंपनीने २००० ट्रान्सफॉर्मर्स तयार ठेवण्याचे निर्देश त्यांनी दिले.