जम्मूजवळ धुमश्‍चक्रीत तीन दहशतवाद्यांना कंठस्नान

0
6
वाढदिवसाच्या शुभेच्छा

तीन जवानही शहीद, घुसखोरीचा डाव फसला

जम्मू/नवी दिल्ली (पीटीआय): जम्मू जिल्ह्यातील अरनिया सीमाभागात घुसखोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दहशतवाद्यांबरोबर उडालेल्या जोरदार धुमश्‍चक्रीत तीन जवान शहीद झालेस तर एक नागरिकाचा मृत्यू झाला. भारतीय सुरक्षा दलाने तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातल्याने दहशतवाद्यांचा घुसखोरीचा डाव फसला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या (शुक्रवारी) राज्याच्या दौऱ्यावर असताना आज दहशतवाद्यांनी भारताच्या एका रिकाम्या बंकरचा ताबा घेऊन घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला असता सुरक्षा दलाने त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले, अशी माहिती नवी दिल्लीतील लष्करी सूत्रांनी दिली. हाती आलेल्या प्राथमिक माहितीनुसार, अरनिया भागातील भारतीय लष्कराच्या एका रिकाम्या बंकरचा ताबा घेण्यासाठी दहशतवादी कारने आले होते. बंकरमध्ये लपलेल्या दहशतवाद्यांना शरण येण्याचे आवाहन भारतीय सुरक्षा लष्कराने केले असता, त्यांनी गोळीबार करण्यास सुरवात केला. या वेळी प्रत्युत्तरादाखल सुरक्षा दलानेही केलेल्या गोळीबारात तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले, तर दहशतवाद्यांबरोबर लढताना तीन जवान हुतात्मा झाले. घटनास्थळावरून एक कारही हस्तगत करण्यात आली आहे.
दरम्यान, ज्या बंकरचा दहशतवाद्यांनी ताबा घेतला आहे तो बंकर उडवून देण्याचा विचार भारतीय लष्कर करीत आहे. एका लालरंगाच्या मारुती कारमधून हे दहशतवादी या बंकरजवळ आले आणि तेथून भारताच्या सुरक्षारक्षकावर हल्ला करण्यास सुरवात केली. या वेळी प्रत्युत्तरादाखल भारतीय सुरक्षा दलानेही गोळीबार केला. दहशतवाद्यांच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकाची ओळख पटली असून, सुनील सबरवाल असे त्याचे नाव असल्याचे एका सरकारी अधिकाऱ्याने सांगितले.

दरम्यान, घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्या संशयित दहशतवाद्यांना सुरक्षा दलाने राजौरी जिल्ह्यातील नियंत्रण रेषेवर अटक केली असून, शोध मोहिमेदरम्यान एक एके-47, तीस काडतुसे, एक पिस्तूल आणि पाकिस्तानी चलनाचे आठ हजार रुपये हस्तगत करण्यात आले आहेत.

पंतप्रधानांचा आज दौरा
काश्‍मीर भाजपचे प्रवक्ते फारुख खान यांनी सांगितले, की पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या उधमपूर आणि पूंच जिल्ह्यात जाहीरसभा घेणार आहेत. सीमा सुरक्षा दलाने जम्मू शहर, उधमपूर आणि पूंच जिल्ह्यात चोख बंदोबस्त ठेवला आहे. दरम्यान, निवडणूक प्रक्रियेत अडथळा आणण्याचा प्रयत्न काही दहशतवादी संघटना करण्याची शक्‍यता लष्कराने कालच व्यक्त केली होती.