देवरीतील अनाधिकृत मेडीकल लॅब वर पोलिसांची कार्यवाही

0
680

श्री क्लिनीकल लेबॉरेटोरीतील मशिनरीसह चार लाखाचा मुद्देमाल जप्त

पॅरावैद्यक कायद्यांतर्गत राज्यातील दुसऱ्या गुन्ह्याची नोंद

देवरी/गडचिरोली,दि.11-  वैद्यक प्रयोगशाळा चालविण्यासाठी आवश्यक असलेली कोणतीही परवानगी नसताना देवरी शहरातील मध्यभागी बिनधास्त सुरू असलेल्या श्री क्लिनिकल लॅबोरेटोरीवर काल (दि.10) रोजी देवरी पोलिसांनी कार्यवाही करीत सुमारे 3 लाख 80 हजाराचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी सदर प्रयोगशाळा संचालकाच्या विरुद्ध महाराष्ट्र पॅरावैद्यक परिषद 2011 च्या कलम 31 व 32 अन्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. सदर कार्यवाहीमुळे गोंंदिया जिल्ह्यात बेकायदेशीर प्रयोगशाळा चालविणाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहे.

उल्लेखनीय म्हणजे पॅरा वैद्यक 

कायद्यांतर्गत नोंदविलेला हा गुन्हा महाराष्ट्र राज्यातील दुसरा गुन्हा देवरीत दाखल झाल्याचे सांगितले जात असून यापूर्वी नागपूर जिल्ह्यातील काटोल शहरात ७ एप्रिल रोजी पहिल्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे, हे विशेष.

सविस्तर असे की, देवरी शहराच्या मध्यभागी असलेल्या कारगील चौकात भंडारा जिल्ह्यातील तुमसर येथील जितेश प्रेमलाल येळमे यांची श्री क्लिनिकल लेबोरेटोरी नावाची वैद्यक प्रयोगशाळा गेल्या काही वर्षापासून सुरू आहे. या संबंधीची माहीती मेडीकल लेबोरेटोरी टेक्नालॉजिस्ट असोशियन ऑफ महाराष्ट्र यांचे निदर्शनात आली. सदर संस्था ही  राज्यातील लॅब धारकांना अद्यावत माहिती देणे, त्यांचे हित व हक्कासाठी काम करीत आहे. महाराष्ट्र परावैद्यक परिषद मुंबई यांचे अधिकृत पत्रानुसार गोंदिया जिल्ह्यातील देवरी येथे अनाधिकृतरीत्या श्री क्लिनिकल लेबोरेटोरी सुरू असल्याची माहिती मिळाली. या प्रकरणातील फिर्यादी हे मेडीकल लेबोरेटोरी टेक्नालॉजिस्ट असोशियन ऑफ महाराष्ट्र यांचे काम पाहत असल्याने त्यांनी सदर प्रयोगशाळेला भेट देवून तपासणी केली असता जितेश येळणे यांचेकडे सदर प्रयोगशाळा चालविण्यासाठी आवश्यक असलेले कोणतेही कागदपत्रे नसल्याचे दिसून आले. तशी तक्रार फिर्यादीने देवरी पोलिसात दाखल केली.

या तक्रारीवरून अपर पोलीस अधिक्षक अशोक बनकर यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार रेवचंद शिंगनजुडे यांनी सदर केंद्रावर धाड टाकून तपासणीसाठी वापरण्यात येणारी यंत्रे ताब्यात घेतली. यामध्ये  सुमारे 3 लाख किमतीची सीबीसी रोल काऊंटर मशिन आणि सुमारे 80 हजार रुपये किमतीची बॉयो केमिस्ट्री मशिन असा 3 लाख 80 हजार रुपये किमतीचा मुद्दमाल जप्त केला. सदर कार्यवाहीमध्ये ठाणेदार सिंगनजुडे यांचे सह सहायक पोलिस निरीक्षक आनंदराव घाडगे, पोलिस नायक सुधीर जांगडे, हातझाडे ना पो शि,पोशि डोहळे व पोशि नेवारे यांचा समावेश होता. या गुन्ह्यातील पुढील  तपास सहायक पोलीस निरिक्षक आनंदराव घाडगे करित आहेत.