चंद्रपूर जवळच्या घंटाचौकी परिसरात आढळला विदर्भातील प्राचीन लोहकारखाना !

0
61

चंद्रपूर,दि,१ एप्रिल–चंद्रपूरपासून मुल मार्गावर १५ किमी अंतरावर घंटाचौकी नावाचे खेडे आणि प्राचीन प्रसिद्ध शिव मंदिर आहे. या मंदिराजवळ तब्बल १ किमी परिसरात ८०० वर्षापूर्वीचा लोखंडी अवजारे बनविण्याचा प्राचीन कारखाना असल्याचे मत भुशास्त्र आणि पुरातत्व अभ्यासक प्रा. सुरेश चोपणे यांनी व्यक्त केले आहे. मंदिरं बांधते वेळी दगड फोडण्यासाठी लागणारी छन्नी आणि इतर अवजारे बनविण्यासाठी मातीचे साचे व गाळलेले लोखंड येथे मोठ्या प्रमाणावर आढळले असून हा लोह कारखाना ११ किंवा १२ व्या शतकातील परमार राजाच्या काळातील असल्याचे मत पुरातत्व अभ्यासक सुरेश चोपणे ह्यांनी व्यक्त केले आहे.

सुरेश चोपणे यांना मागिल १५ वर्षापूर्वी हे स्थळ आढळले होते. परंतु तेथे केवळ गाळलेल्या लोखंडाचे तुकडे आढळत होते. परंतु मागील वर्षी लॉकडाऊनच्या काळात तिथे सविस्तर सर्वेक्षण आणि थोडे उत्खनन करून पाहिले असता गाळलेल्या लोखंडाचे असंख्य लहान-मोठे तुकडे, लोखंडाची अवजारे बनविण्यासाठी दोन छिद्रांचे अनेक मातीचे साचे सापडले. अशा प्रकारचे विविध काळातील लोह कारखाने चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात आढळले आहेत. परंतु एक किमी परिसरात पसरलेला हा सर्वात मोठा प्राचीन लोह कारखाना असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

बहुदा येथून बनविलेली छन्नी आणि इतर अवजारे विविध ठिकाणी दगड फोडून मंदिरे आणि वास्तू बांधण्यासाठी वापरली जात असावी. त्या पुढील काळातील राजांनीसुद्धा या भागातील लोहखडकापासून अवजारे बनविली असण्याची शक्यता आहे. अजून इथे नाणी किंवा इतर ऐतिहासिक पुरावे मिळाले नाही. परंतु पुढील सविस्तर संशोधनाअंती आणि मिळणाऱ्या साहित्याच्या आधारे ह्या प्राचीन वारशाची अचूक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

चौकीचे हे शिव मंदिर नागरी स्थापत्य शैलीनुसार ११ व्या शतकात राजा जगदेव परमार यांच्या काळात बांधले गेले होते. परमार राजे हे शिवभक्त असल्यामुळेच त्यांनी आजच्या चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात अनेक मंदिरे बांधली. त्यात प्रसिद्ध मार्कंडा मंदिर समूह, सिद्धेश्वर मंदिर समूह, गडचांदूर येथील मंदिर समूह, जुगादचे मंदिर आणि भटाळा येथील भोंडा महादेव मंदिर बांधले होते. या सर्व मंदिरांच्या बांधकामासाठी विविध आकाराचे दगडांना आकार देण्यासाठी छन्नी आणि इतर अवजारे लागत असत. अवजारांसाठी प्राचीन काळात लोह खनिज असलेल्या दगडापासून भट्टी च्या माध्यमाने तरल लोखंड तयार केले जात असावे. या तरल लोखंडाला मातीच्या साच्यात टाकून विशिष्ट आकाराची अवजारे बनविली जात असत. परंतू ह्यासाठी लोह खनिजे असलेल्या ठिकाणांचा शोध घेवून तिथे अशा दगडांना भट्टीत उच्च तापमानात तापवून तरल लोह बनविले जायचे. हे तरल धातू योग्य मापाच्या साच्यात ओतून अवजारे बनविली जात. लोहारा आणि घंटाचौकी परिसर हा अशा लोह खनिज असलेल्या दगडांनी समृद्ध आहे. यामुळेच जवळच्या गावाला लोहारा हे नाव पडले असावे. ह्याच परिसरातील ऐतिहासीक आणि भौगोलिक खडक त्यांच्या अश्म संग्राहालयात ठेवले असल्याची बाब प्रा. सुरेश चोपणे यांनी नमूद केली आहे.