कोरोना वाढतोय, महाराष्ट्रातही निर्बंध लागणार?

0
44

मुंबई : गेल्या काही दिवसांमध्ये देशात कोरोना विषाणूच्या संसर्गाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने महाराष्ट्रासह एकूण पाच राज्यांना खबरदारी घेण्याचे पत्र पाठवल्याने आता निर्बंधमुक्त झालेल्या महाराष्ट्रात पुन्हा एकदा निर्बंध लागणार का, अशी चर्चा सुरू झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यातील जनतेला घाबरून न जाण्याचे आवाहन केले आहे. तसेच राज्यातील कोरोनाची स्थिती नियंत्रणात असल्याचे म्हटले आहे.

राज्यातील कोरोना निर्बंधांबाबत राजेश टोपे म्हणाले की, महाराष्ट्रामधील कोरानाची परिस्थिती नियंत्रणामध्ये आहे. त्यामुळे कुणीही घाबरून जाऊ नये. केंद्र सरकारने पाठवलेल्या पत्रामध्ये इतर राज्यांचाही उल्लेख आहे. सध्या दिल्लीमध्ये कोरोनाचे रुग्ण काही प्रमाणात वाढत आहेत. मात्र सध्यातही महाराष्ट्रामध्ये मास्कसक्ती केली जाणार नाही, असेही राजेश टोपे यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, केंद्र सरकारने वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी दिल्ली, उत्तर प्रदेश, हरियाणा, महाराष्ट्र आणि मिझोराम या राज्यांचा पत्र लिहून काही सूचना दिल्या आहे. केंद्राने या राज्यांना कोरोनाच्या परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवण्याचे आणि आवश्यकता भासल्यास संसर्ग पसरण्यापासून रोखण्यासाठी सर्व आवश्यक ती पावले उचलण्याचा सल्ला दिला आहे. देशामध्ये यावेळी सर्वाधिक कोरोना रुग्ण हे दिल्लीमध्ये सापडत आहेत. येथे पॉझिटिव्हिटी रेट सर्वाधिक आहे.

केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी महाराष्ट्र आणि दिल्लीसह एकूण पाच राज्यांना कोरोनाविरोधात फाइव्ह फोल्ड रणनीती वापरण्याची सूचना केली आहे. यामध्ये टेस्ट, ट्रेक, ट्रीट, व्हॅक्सिनेशन आणि कोरोना नियमांचे पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच सार्वजनिक ठिकाणी मास्क अनिवार्य करण्यास सांगण्यात आले आहे.

दरम्यान, महाराष्ट्रामध्येही मंगळवारी कोरोनाचे रुग्ण वाढलेले दिसले होते. मंगळवारी महाराष्ट्रामध्ये कोरोनाचे १३७ रुग्ण सापडले. तर एक दिवस आधी हा आकडा ५९ एवढा होता. गेल्या आठवडाभरात महाराष्ट्रामध्ये कोरोनाचे ६९३ रुग्ण सापडले आहेत.