केवायसीच्या नावावर फसवणारी टोळी सक्रीय

0
31

कृष्णा ब्राम्हणकर यांची माहिती

देवरी,दि.27- देशात सर्वत्र डिजीटल युगाचे वारे वाहत आहेत. यामुळे आपल्या ग्राहकांची ओळख पक्की करण्यासाठी अनेक संस्था केवायसी अपडेट ऑनलाइन पद्धतीने करीत आहेत. नेमका याच बाबीचा फायदा घेत काही असामाजिक तत्वे तालुक्यात सक्रीय झाले असून केवायसीच्या नावावर ग्रामीणांची लूट करीत असल्याची धक्कादायक माहिती कृष्णा ब्राम्हणकर यांनी दिली आहे.

सविस्तर असे की, देवरी तालुक्यात पीएम किसान योजनेचा लाभ घेण्याकरीता ऑनलाइन केवायसी अपडेट करणे जोरात सुरू आहे. या योजनेचा फायदा मिळावा यासाठी ग्रामीण भागातील लाभार्थी मोठ्या प्रमाणावर ऑनलाईन सेटरवर तोबा गर्दी करीत आहेत. या केंद्रांवर एवढा कामाचा बोजा आहे की अनेक ठिकाणी पहाटे सुद्धा ऑनलाइन केंद्रे सुरू असल्याची माहिती आहे.

नेमका याच बाबीचा फायदा घेण्याच्या उद्देशाने तालुकाबाह्य काही तरूणांची टोळी तालुक्यात सक्रिय झाल्याचे सांगण्यात येत आहे. हे भामटे गरजू लोकांना हेरून त्यांचे कडून केवायसी अपडेशनच्या नावावर 100 -100 लूट करीत आहेत. ऑनलाईनची साईट बंद असताना सुद्धा हे भामटे तुमची केवायसी पूर्ण झाल्याची बतावणी करून फसवणूक करीत आहेत.

तरी शेतकरी बांधव आणि इतरांनी सुद्धा या लोकांच्या जाळ्यात न अडकता आपल्या ओळखीच्या संगणक परिचालक अथवा अधिकृत आनलाईन सेंटरवरून आपली केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन कृष्णा ब्राम्हणकर यांनी केले आहे.