हनुमान चालिसा लावल्याने भुकेचा प्रश्न सुटणार आहे का? मुलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष नको

0
21

गेल्या काही दिवसांपासून राज्यात हिंदुत्व आणि हनुमान चालिसा पठण यावरुन विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये जुपल्याचं पाहायला मिळत आहे. यातच आम्ही हनुमान चालिसा लावणार, आम्ही हे करणार, आम्ही ते करणार, अशाच मागण्या केल्या जात आहेत. या सगळ्यामुळे बेकारीसह सामान्य नागरिकांचे मूलभूत प्रश्न सुटणार आहेत का? त्यांच्या भूकेचा प्रश्न सुटणार आहे का? असा सवाल राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी केला. अशाप्रकारे मूळ प्रश्नांना बगल देऊन अन्य प्रश्नांवर लक्ष केंद्रीत करण्याचा पवित्रा समाजातील काही घटकांनी घेतला आहे. त्यांना उत्तर द्यायचे असेल तर शाहू-फुले-आंबेडकर यांचा विचार हाच एक उपाय असल्याचे पवारांनी म्हटलं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विमुक्त जाती, भटक्या जमाती व मागासवर्गीय सेलतर्फे आयोजित कृतज्ञता गौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात ते बोलत होते.

गेल्या काही दिवसांपासून जात-धर्माच्या नावाने पुन्हा एकदा या समाजाला व देशाला मागे न्यायचा प्रयत्न सुरु आहे. महागाई, बेरोजगारी व अन्नधान्याची दरवाढ हे लोकांचे मूलभूत प्रश्न आहेत. मात्र हे प्रश्न दुर्लक्षित केले जात आहेत आणि संपूर्ण समाजाला या मुख्य प्रश्नांपासून दूर नेले जात आहे. देशातील मूळ प्रश्नांना बगल देऊन भलत्याच गोष्टींकडे समाजाला वळवून स्वतःचा स्वार्थ साधत काही घटकांनी निकाल घेतला आणि त्या गोष्टीला प्रसिद्धी मिळते हे खेदजनक आहे, अशी खंत शरद पवारांनी व्यक्त केली.


शाहू-फुले-आंबेडकरांचे नाव घेतो म्हणून एका नेत्याने माझ्यावर टीका केली. मग नावं कुणाची घ्यायची? आज श्रीलंकेत दंगा सुरू आहे. दुसरीकडे पाकिस्तानमध्ये पंतप्रधानांना जावं लागलं, मात्र हिंदुस्थान एवढा मोठा देश आहे. अनेक भाषा, अनेक जाती आहेत. त्यामुळे हा एकसंघ राहिला याचं कारण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले संविधान आहे. त्यामुळे शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांनी आपण काम करत राहिले पाहिजे. संघटनेने या सर्व घटकांना त्या दिशेने न्यायचे आहे. हे काम केलेत तर लवकर आपली नवी पिढीही शिक्षित होईल, समृध्द होईल. न्यायासाठी प्रसंगी संघर्ष करेल व आपले मुलभूत अधिकार आपल्या पदरात पाडून घेऊन जीवनमान बदलेल. तसा प्रयत्न करण्याची सर्वांची जबाबदारी आहे, असेही शरद पवार यांनी म्हटलं.

भटक्या-विमुक्त जातीजमातीवर बोलताना शरद पवार म्हणाले, महाराष्ट्रामध्ये अनेक जातीजमाती आहेत. आपला देश स्वतंत्र झाला असला तरी त्या स्वातंत्र्याचा खरा अर्थ अजूनही त्यांच्या घरांपर्यंत पोहचलेला नाही. अशा वर्गांसाठी आपण अधिक प्रयत्न करणे गरजेचे आहे. कारण या जातींचं दुखणं अजून कमी झालेलं नाही. भटक्या विमुक्तांसाठी काम करणाऱ्या महाराष्ट्रात काही चांगल्या संघटना आहेत, असे पवार म्हणाले.