नागपूरमध्ये भीषण अपघात:ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या नादात कार पलटली; 7 जण जागीच ठार

0
164

नागपूर–नागपूरमधल्या उमरेड रोडवर शनिवारी झालेल्या कार-ट्रकच्या भीषण अपघातामध्ये 7 जण जागीच ठार झाले. ओव्हरटेक करणाच्या नादातून हा अपघात झाल्याची माहिती पोलिसांनी दिली असून, या दुर्घटनेत कारमधील लहान मुलगी आश्चर्यकाररित्या बचावली आहे. तिच्यावर नागपूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतांमध्ये 6 महिलांचा समावेश आहे.

कसा झाला अपघात?

उमरेड रोडवरून एक कार नागपूरकडे जात होती. यावेळी कारचा वेग ताशी 100 किलोमीटरपेक्षा जास्त होता. ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या नादात कार त्याच ट्रकला धडकली. त्यामुळे ती अनेकदा पलटी झाली. या घटनेत 7 जणांनी जागेवरच प्राण सोडले. कारमध्ये एका लहान मुलींसह नऊ जण होते. यापैकी एका व्यक्तीची प्रकृती गंभीर आहे. हा अपघात इतका भीषण होता की, त्यामुळे पाहणाऱ्यांच्या हृदयाचे ठोके चुकले. कारमधून मृतांना काढणेही अवघड झाले होते.

6 तास वाहतूक कोंडी

स्थानिक नागरिकांनी या अपघाताची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिस उपायुक्त नुरुल हसन, वाहतूक विभागाचे उपायुक्त सारंग आव्हाड आणि पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. अपघातानंतर किती तरी वेळ वाहतूक कोंडी झाली. रस्त्यांवर शेकडो गाड्या रांगेत उभ्या होत्या.

नगरमध्येही 7 ठार

कोपरगाव (जि. अहमदनगर) तालुक्यातील डाऊच खुर्द परिसरात कोपरगाव महामार्गावर शुक्रवारी सकाळी पगारे वस्तीनजीक कंटेनरने रिक्षाला जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की चेंदामेंदा झालेल्या ॲपे रिक्षातील 7 जणांचा मृत्यू झाला. 6 गंभीर जखमी झाले. अपघातानंतर कंटेनरचा चालक दर्शनसिंग गजनसिंग (४२, रा. दानामंडी, लुधियाना, पंजाब) नाशिकच्या दिशेने फरार झाला होता. मात्र, स्थानिक नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.