मुख्यमंत्रीपदाच्या लायक नसल्याचे समोर येऊन सांगा, राजीनामा तयार; उद्धव ठाकरें

0
49

“>मुंबई– मी मुख्यमंत्रीपदाच्या लायक नसल्याचे समोर येऊन सांगा. राजीनामा तयार आहे, असे म्हणत बुधवारी मुख्यमंत्री आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंनी बंडखोरांना साद घातली. एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर त्यांनी आपली भूमिका फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून विशद केली. आता यावर एकनाथ शिंदे काय बोलतात याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. शिंदे सायंकाळी सात वाजता गुवाहटीत पत्रकार परिषद घेणार आहेत.

शिवसेना हिंदुत्वापासून आणि हिंदुंत्व शिवसेनेपासून दूर होऊ शकत नाही. विधान भवनात हिंदुत्वाबाबत बोलणारा मी पहिला मुख्यमंत्री आहे. ही शिवसेना बाळासाहेबांची नाही असे भासवण्याचा प्रयत्न चुकीचा आहे. बाळासाहेबांच्या नंतरच्या शिवसेनेनी तुम्हाला खूप काही गेले हे लक्षात ठेवा असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

शस्त्रक्रियेमुळे भेटू शकत नव्हतो. शिवसेना आणि हिंदुत्व एकमेकांशी जोडलेले शब्द. हो दोन्ही शब्द कदापिही एकमेकांपासून वेगळे होऊ शकत नाहीत. त्यामुळे गेल्या काही दिवसांपूर्वी आदित्य, एकनाथ शिंदे सारे अयोध्येला गेले. हिंदुत्वावार बोलण्याची ही वेळ नाही. मग नेमके झाले काय, ही शिवसेना कोणाची. काही जण ही बाळासाहेबांची शिवसेना राहिलेली नाही म्हणतात. ठीक आहे. असं मी काय केलंय. त्यावेळेला जे विचार होते, तेच मी पुढे नेतोय. 2014 साली प्रतिकूल परिस्थितीत 63 आमदार निवडून आणले. पहिल्या प्रथम शिवसेना कोणाची, हिंदुत्व सोडले का, मधल्या काळात जे काही दिले, ते बाळासाहेबानंतर शिवसेनेने दिले.

सध्या राज्यात काय चाललंय. काही सूरतला गेले. त्यानंतर गुवाहटीला गेले. काल परवा विधान परिषदेची निवडणूक झाली. या निवडणुकीच्या अधल्या दिवशी सगळे आमदार हॉटेलमध्ये होते. मी तिकडे गेलो. ज्यांना आपले मानतो. आपली माणसं यांना एकत्र ठेवावे लागते. शंका ठीक आणि लघुशंकेला गेले तर शंका. ही कसली लोकशाही.

साधा महापालिकेत उभा न राहिलेला माणूस मुख्यमंत्री कसा होणार हा प्रश्न मी पवारांना विचारला. पण त्यांनी आग्रह केला. मग म्हटलं, ठीक आहे होऊयात. राजकारण हे राजकारण असलं पाहिजे. वळणदार राजकारण रडकुंडीच्या घाटासारखं असू नये. प्रशासनाने मला सांभाळून घेतलं. मला धक्का कशाचा बसला आहे? तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीने म्हटले की, आम्हाला मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे नकोयत, तर एक वेळ ठीक आहे. आज कमलनाथ यांनी स्वत: फोन करून म्हटले की, उद्धवजी आम्ही तुमच्यासोबत आहोत. पण माझ्याच लोकांना मी नको आहे, त्याला काय म्हणावं?

आजही या लोकांपैकी एकानेही सांगितले की, उद्धवजी आम्हाला तुम्ही मुख्यमंत्री म्हणून नको आहात, तर मी आजच वर्षा सोडून मातोश्रीवर जायला तयार आहे. त्यांनी हे समोर येऊन बोलावे, उगाचं शिवसेनेला आम्ही सोडणार नाही, हिंदुत्वाचा मुद्दा असे याच्या त्याच्या पाशी सांगू नये. मी सत्तेला चिकटून बसणारा माणूस नाही. मी शिवसेना प्रमुखांचा पुत्र आहे. मला सत्तेचा मोह नाही. कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ अशी एक म्हण आहे, तशीच परिस्थिती आता आली आहे.