आता मेल, एक्सप्रेस रेल्वेगाडय़ांतून सर्वसाधारण तिकिटावर प्रवास ; २९ जूनपासून सुविधा

0
40

नागपूर : करोना काळात बंद करण्यात आलेली मेल आणि एक्सप्रेस रेल्वेगाडय़ांतील सर्वसाधारण (जनरल) तिकीट सुविधा २९ जूनपासून पुन्हा सुरू होत आहे. तब्बल दोन वर्ष ही सुविधा बंद होती. आता मात्र प्रवाशांना सर्वसाधारण तिकिटावर प्रवास करता येणार आहे. या निर्णयामुळे ऐनवेळी प्रवास करणाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

करोना काळात अतिरिक्त गर्दी टाळण्यासाठी मेल आणि एक्सप्रेस रेल्वेगाडय़ांमध्ये सर्वसाधारण डब्यासाठीदेखील तिकीट आरक्षित करावे लागत होते. टाळेबंदी शिथिल झाल्यानंतरही रेल्वेने तेच धोरण कायम ठेवले. त्याचा फटका ऐनवेळी प्रवास करणाऱ्यांना बसत होता. कारण, एका गाडीला एक किंवा दोन सर्वसाधारण डबे राहतात. त्याचे आरक्षणदेखील मर्यादित असते. तेथे प्रतीक्षा यादीचा प्रश्नच येत नाही. अशावेळी ऐनवेळी प्रवास करायचा कसा, असा प्रश्न प्रवाशांसमोर होता. त्यामुळे सर्वसाधारण तिकीट पूर्ववत करण्याची मागणी केली जात होती. मध्य रेल्वेने यासंदर्भातील निर्णय घेतला असून २९ जूनपासून तो लागू केला जाणार आहे. त्यामुळे प्रवाशांना आरक्षणाशिवाय ऐनवेळी तिकीट काढून प्रवास करता येणार आहे. मध्य रेल्वेच्या सर्व मेल, एक्सप्रेस आणि अतिजलद (सुपरफास्ट) गाडय़ांचे सर्वसाधारण तिकीट सर्वत्र उपलब्ध होणार आहे.

करोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर १ मार्च २०२२ पासून रेल्वेच्या काही गाडय़ांमध्ये सर्वसाधारण तिकीट सुरू करण्यात आले. पण, ते मोजक्याच गाडय़ांसाठी होते. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत होती. पण, आता सर्वच मेल, एक्सप्रेस व अतिजलद गाडय़ांसाठी हे तिकीट दिले जाणार आहे. रेल्वेस्थानकावरील अनारक्षित तिकीट खिडकीवर, एटीव्हीएम, जीटीबीएस व यूटीएस मोबाईल अ‍ॅपद्वारे हे सर्वसाधारण तिकीट मिळणार आहे. यासंदर्भात मध्य रेल्वेचे वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक कृष्णाथ पाटील म्हणाले, सर्वसाधारण तिकीट सुरू करा, अशी प्रवाशांची मागणी होती. त्यानुसार, २९ जूनपासून मध्य रेल्वेच्या सर्वच मेल व एक्सप्रेस रेल्वेगाडय़ांसाठी सर्वसाधारण तिकीट उपलब्ध होणार आहे.