
डेहराडून-उत्तराखंडमध्ये मंगळवारी मोठी दुर्घटना घडली. केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळले. केदारनाथपासून 2 किमी अंतरावर असलेल्या गरुडचट्टीमध्ये हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. गुप्तकाशीहून हेलिकॉप्टरने उड्डाण केले होते. हेलिकॉप्टर केदार घाटीकडे जात असताना गरुडचट्टी येथे कोसळले. हेलिकॉप्टरमध्ये 7 जण होते असे सांगण्यात येत आहे. या दुर्घटनेत सर्वांचाच दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती वृत्तसंस्थेने दिली आहे.
हे हेलिकॉप्टर आर्यन हेली या खासगी कंपनीचे असल्याचे सांगण्यात येत आहे. ही कंपनी उत्तरकाशीची आहे. ही कंपनी केदारनाथच्या दर्शनासाठी भाविकांना टूर पॅकेज देते. खराब हवामानामुळे हा अपघात झाल्याचे समोर आले आहे.
केदारनाथ येथील एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, येथे जोरदार पाऊस पडत आहे. अवघ्या 15 मिनिटांत अचानक हवामान खराब झाले. यानंतर आमचे उड्डाणही बंद झाले. आम्हाला सांगण्यात आले आहे की हेलिकॉप्टर क्रॅश झाले आहे. उड्डाण नुकतेच थांबवले आहे. त्यांनी सांगितले की, या हेलिकॉप्टरमध्येही प्रवासीच स्वार होते.


21-22 ऑक्टोबरला पंतप्रधान मोदींचा दौरा
पंतप्रधान मोदी 21 ऑक्टोबरला केदारनाथला भेट देणार आहेत. ते केदारनाथला पोहोचतील आणि तेथे सुरू असलेल्या विकास प्रकल्पांचा आढावा घेतील. बाबा केदार यांच्या दर्शनानंतर पीएम मोदी बद्रीनाथलाही जाणार आहेत. 21 ऑक्टोबर रोजी केदारनाथला भेट दिल्यानंतर पंतप्रधान मोदी तेथे रात्रभर मुक्काम करतील. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच 22 ऑक्टोबरला ते बद्रीनाथला भेट देणार आहेत.