
नवी दिल्ली येथील 24 अकबर रोडवर असलेल्या अखिल भारतीय काँग्रेस कमिटी (AICC) कार्यालयात सकाळी 10 वाजेपासून काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली आहे. दुपारी 4 वाजेपर्यंत निकाल लागणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
मल्लिकार्जुन खरगे आणि शशी थरूर हे निवडणुकीत आमनेसामने आहेत, पण गांधी कुटुंबाचा पाठिंबा असल्याने खरगे यांचा विजय निश्चित असल्याचे बोलले जात आहे. या निवडणुकीत 9900 मतदारांपैकी 9500 मतदारांनी मतदान केले होते. काँग्रेस नेते प्रमोद तिवारी म्हणाले की, खरगे 90% पेक्षा जास्त मतांनी विजयी होतील.
अशी होणार मतमोजणी
17 ऑक्टोबर रोजी मतदान झाल्यानंतर सर्व बूथवरील मतपेट्या एआयसीसी कार्यालयात मागविण्यात आल्या होत्या. बुधवारी मतमोजणी सुरू होण्यापूर्वी मतपत्रिकांची मिक्सिंग केली जाईल जेणेकरून कोणत्या उमेदवाराला कोणत्या राज्यात किती मते मिळाली हे कळू शकणार नाही. यानंतर, मतांची वर्गवारी केली जाईल, त्यानंतर 50-50 मतांची मोजणी केली जाईल.

36 मतदान केंद्रांवरील 67 बूथवर मतदान झाले
काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक प्राधिकरणाने (सीईए) निवडणुकीत 36 मतदान केंद्रांवर 67 बूथ उभारले होते. सर्वाधिक 6 बूथ यूपीमध्ये होते. प्रत्येक 200 प्रतिनिधींसाठी एक बूथ तयार करण्यात आला होता. भारत जोडो यात्रेत सहभागी झालेल्या राहुल गांधींसह 47 प्रतिनिधींनी कर्नाटकातील बेल्लारी येथे मतदान केले. येथे यात्रेच्या छावणीत स्वतंत्र मंडप करण्यात आला.
यापूर्वी 1998 मध्ये झाली होती निवडणूक
काँग्रेसमध्ये अध्यक्षपदासाठी शेवटचे मतदान 1998 मध्ये झाले होते. तेव्हा सोनिया गांधींसमोर जितेंद्र प्रसाद होते. सोनिया गांधींना सुमारे 7,448 मते मिळाली, तर जितेंद्र प्रसाद यांना 94 मते पडली होती. सोनिया गांधी अध्यक्ष झाल्यावर गांधी घराण्याला कधीही आव्हानांचा सामना करावा लागला नाही.
काँग्रेसला 65वे अध्यक्ष मिळणार
ही निवडणूक जो जिंकेल तो काँग्रेस अध्यक्ष होणारा 65वा नेता असेल. यातील अनेक नेते एकापेक्षा जास्त वेळा अध्यक्ष झाले आहेत. खरगे ही निवडणूक जिंकल्यास काँग्रेसचे अध्यक्ष होणारे ते दुसरे दलित नेते असतील. बाबू जगजीवन राम हे काँग्रेसचे अध्यक्ष झालेले पहिले दलित नेते होते. स्वातंत्र्यानंतरच्या 75 वर्षांत 42 वर्षे पक्षाची सूत्रे गांधी घराण्याकडे होती. त्याच वेळी 33 वर्षे पक्षाध्यक्षपदाचा भार गांधी घराण्याव्यतिरिक्त इतर नेत्यांकडे राहिला.
थरूर यांचे ट्विट – इतिहास लक्षात ठेवेल, आम्ही गप्प बसलो नव्हतो

मतदानापूर्वी शशी थरूर यांना राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, पंजाब आणि हरियाणासह अनेक राज्यांमध्ये पोलिंग एजंट मिळाले नाहीत. त्यानंतर काँग्रेसने नियम बदलले आणि त्यांना पोलिंग एजंट दिले. काँग्रेसच्या घटनेनुसार जे प्रतिनिधी मतदान करतात तेच पोलिंग एजंट असतात. दरम्यान, शशी थरूर यांनी ट्विटमध्ये लिहिले – आम्ही काही लढायादेखील लढतो जेणेकरून इतिहास हे लक्षात ठेवेल की वर्तमान शांत नव्हता.
खरगे विरुद्ध थरूर : 2 वक्तव्ये…
1. शशी थरूर- काँग्रेसचे भवितव्य कार्यकर्ते ठरवतील. काँग्रेसमध्ये परिवर्तनाचे पर्व सुरू झाले आहे. मी खरगे यांच्याशी बोललो आणि त्यांना शुभेच्छा दिल्या. निकाल काहीही लागला तरी आम्ही मित्र राहू.
2. मल्लिकार्जुन खरगे- हा आपल्या अंतर्गत निवडीचा भाग आहे. आम्ही एकमेकांना सांगितलेली प्रत्येक गोष्ट मैत्रीपूर्ण होती. एकत्र पक्ष उभारायचा आहे. थरूर यांनी मला फोन करून शुभेच्छा दिल्या आणि मीही त्यांचे अभिनंदन केले.