नाशिक- रोड रेल्वे स्थानकावर द बर्निंग ट्रेनचा थरार पाहायला मिळाला. स्थानकावर गाडी थांबलेली असताना सकाळी 8.43 वाजता शालिमार एलटीटी एक्सप्रेसच्या लगेजच्या डब्यात आग लागली. यावेळी रेल्वे प्रशासनाने लगेजचा डबा प्रवासी डब्ब्यापासून वेगळा केला. तो संपुर्ण डबा जळून खाक झाला. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, मोठी वित्तहानी झाली आहे.

मुंबईकडे येणारी हावडा एक्सप्रेस नाशिक रोड स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वर उभी होती. यावेळी सकाळी 8.30 वाजता अचानक आग लागली. नाशिक स्थानकावर सर्वत्र धुराचे लोट पाहण्यास मिळत आहेत. या घटनेमुळे रेल्वे स्थानक परिसरात एकाच गोंधळ उडाला. रेल्वेतील प्रवासी चांगलेच धास्तावले आणि त्यांनी आरडा-ओरड सुरू केली. प्रवाशांनी पटापट जीवमुठीत घेऊन रेल्वेतून बाहेर उड्या मारल्या.

आग लागल्याचे माहिती मिळताच लगेचच आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. अधिकाऱ्यांनी तातडीने पावले उचलत पुढचा अनर्थ टळेल, याची खात्री केली. दरम्यान महिनभरापूर्वी नाशिकमध्ये खासगी बसला आग लागल्याची घटना घडली होती.
