मुख्यमंत्र्यांना काळ्या कपड्यांची एलर्जी?; सभास्थळी महिलांच्या काळ्या ओढण्या काढून ठेवण्याचा विचित्र प्रकार

0
55

भंडारा,दि.12ः  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जिल्ह्यात प्रथमच आगमन होत असल्यामुळे शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि पदाधिकाऱ्यांमध्ये प्रचंड उत्साह संचारला आहे. जाहीर सभेच्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मात्र, मुख्यमंत्र्यांना काळ्या कपड्यांची एलर्जी आहे की काय? अशी चर्चा सभास्थळी रंगली आहे. सभेला आलेल्या महिलांच्या अंगावरील काळ्या ओढण्या जमा करून त्या एका कोपऱ्यात ठेवण्यात आल्याचा विचित्र प्रकार दिसून आला.शहरातील खात रोड येथे मुख्यमंत्र्यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. याकरिता गर्दी दाखविण्यासाठी मोठ्या प्रमाणात शहराच्या कानाकोपऱ्यातून आणि बाहेर गावाहून मोटारीने नागरिकांना जमा करून आणण्यात आले. महिलांना २०० रू . रोजंदारीने गर्दी दाखविण्यासाठी आणण्यात आल्याचे काही महिलांनी सांगितले. यात विरोधकांकडून मुख्यमंत्र्यांच्या स्वागत सोहळ्यात बाधा होऊ नये किंवा कुणीही काळे झेंडे दाखवून नये अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशी ताकीद पोलीस प्रशासनाकडून देण्यात आली. मात्र काळ्या झेंड्यासोबत मुख्यमत्र्यांना काळ्या कपड्यांची एलर्जी आहे का ? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. कारण, महिलांच्या अंगावरील काळ्या ओढणी काढून जमा केल्या जात आहेत.