मुंबई,- देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाच्या शपथविधी सोहळ्यासाठी महायुतीतील मित्रपक्षांना निमंत्रण देण्यात आलेले नाही. शिवसेना व भाजपा एकत्र आल्याचा आम्हाला आनंदच असून मंत्रिपदासाठी त्यांच्या मागे फिरणार नाही असे सांगत रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी नाराजी व्यक्त केली.
शिवसेना – भाजपाचे मनोमिलन झाल्यानंतर आज दुपारी चार वाजता फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाणार आहे. या शपथविधी सोहळ्यात भाजपाचे ८ ते १० तर शिवसेनेचे १० नेते पद आणि गोपनीयतेची शपथ घेतील. या. मित्रपक्षांना पुढील मंत्रिमंडळ विस्तारात सत्तेस सहभागी करुन घ्यायचे असा निर्णय भाजपाने घेतल्याचे समजते. मात्र शपथविधी सोहळ्यासाठी रासप, स्वाभिमानी संघटना व रिपाइ या तिन्ही पक्षांच्या नेत्यांना निमंत्रण देण्यात आलेले नाही. भाजपाने जनतेला दिलेली आश्वासनं पूर्ण करावीत, ग्रामीण भागातील प्रश्न सोडवण्यासाठीच आमचा एक आमदार मंत्रिमंडळात असायला पाहिजे होता अशी प्रतिक्रिया राजू शेट्टी यांनी दिली. मित्रपक्षांचीही तितकीच काळजी घेऊ असे म्हणणा-या देवेंद्र फडणवीस यांना आता मित्रपक्षांचा विसर पडल्याचे दिसते