राज्यपाल रमेश बैस यांनी घेतली शपथ

0
16

मुंबई-नवनियुक्त राज्यपाल रमेश बैस यांनी आज राज्यपालपदाची शपथ घेतली आहे. राजभवनमधील दरबार हॉलमध्ये शनिवारी (दि.18) हा शपथविधी सोहळा पार पडला. मुंबई उच्च न्यायालयाचे हंगामी मुख्य न्यायमूर्ती संजय गंगापूरवाला यांनी रमेश बैस यांना पदाची शपथ दिली.

या शपथविधी सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सर्व मंत्री उपस्थित होते. तर, राज्यपालपदावरून निवृत्त होत असलेले भगतसिंह कोश्यारी यांना राजभवनातील कर्मचारी व अधिकाऱ्यांतर्फे गुरुवारी राजभवन येथे निरोप देण्यात आला. रमेश बैस हे महाराष्ट्राचे 23 वे राज्यपाल बनले आहेत.

रमेश बैस यांनी पदाची शपथ घेतल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, महाराष्ट्राला अभ्यासू व्यक्तिमत्व असलेले राज्यपाल लाभले आहेत. त्यांच्या अनुभवाचा महाराष्ट्राला नक्कीच फायदा होईल.

आपल्या वादग्रस्त वक्तव्यांनी सतत टीकेचे धनी बनलेल्या महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आपले पद सोडण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानुसार 12 फेब्रुवारीला भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर करण्यात आला. त्यानंतर लगेचच रमेश बैस यांच्या नावाची महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून जाहीर घोषणा करण्यात आली.

कोण आहेत रमेश बैस?

झारखंडचे राज्यपाल आणि माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळातील माजी केंद्रीय मंत्री रमेश बैस यांना महाराष्ट्राचे नवे राज्यपाल बनवण्यात आले आहे. भारतीय जनता पक्षाचे (भाजप) एक सामान्य कार्यकर्ता म्हणून रायपूर महानगरपालिका, मध्य प्रदेश विधानसभा आणि नंतर लोकसभेत प्रतिनिधित्त्व केलेले रमेश बैस सध्या झारखंडचे राज्यपाल म्हणून कार्यभार सांभाळत होते.

रमेश बैस यांनी छत्तीसगडमधील रायपूरचे प्रतिनिधित्व केले. त्यांच्या राजकीय कारकिर्दीच्या सुरुवातीपासून ते भारतीय जनता पक्षाशी संबंधित आहेत. सामाजिक जीवनाला सुरुवात करून राजकारणात आल्यानंतर रमेश बैस 1978 मध्ये रायपूर महानगरपालिकेत पहिल्यांदा निवडून आले होते.