अर्थसंकल्पीय अधिवेशन:तातडीने कांदा खरेदी सुरू करा, निर्यातीवरील बंदी उठवा; विधानसभेत विरोधक आक्रमक

0
11

कांदा, कापसाच्या पडलेल्या भावामुळे राज्यभरात शेतकरी संतप्त आहे. काल नाशिकमध्ये कांदा उत्पादकांनी लिलावही बंद पाडला. यावरुन आज विरोधक आक्रमक झाले आहेत. विधानसभेच्या पायऱ्यांवर विरोधकांनी जोरदार आंदोलन केले.

LIVE

  • राज्यभरात कांद्याचे भाव अवघ्या 2 ते 3 रुपये किलोंवर आले आहेत. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज याचे तीव्र पडसाद उमटले. कांद्याचे दर वाढावेत म्हणून राज्य सरकारने तातडीने कांदा खरेदी सुरू करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली. तर, केंद्र सरकारकडे पाठपुरावा करुन कांदा निर्यात पुन्हा सुरू करण्यासाठी राज्य सरकारने पाठपुरावा करावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी केली. सध्या केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर बंदी घातली आहे, असे भुजबळ म्हणाले.
  • अजित पवार यांनी आज सभागृहात केवळ कांदा, कापूस, तूर, हरभरा उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्येवर चर्चा करण्याची मागणी केली. अजित पवार म्हणाले, आज सभागृहात इतर सर्व मुद्दे सोडून केवळ शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर प्राथमिकतेने चर्चा करण्यात यावी.
  • यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, राज्यात नाफेडने कांदा खरेदी सुरू केली आहे. सरकार कांदा उत्पादकांच्या पूर्णपणे पाठिशी आहे.
  • डोक्यावर कांद्याचे टोपले घेऊन विरोधक विधानभवनात दाखल झाले आहेत. देशभरातील किरकोळ बाजारात कांदा प्रतिकिलो 15 ते 25 रुपये विकला जात आहे. मात्र, राज्यात कांद्याला 2 ते 4 रुपये किलो भाव मिळत आहे. सरकार कांदा उत्पादकांकडे दुर्लक्ष करत आहे, असा आरोप विरोधकांनी केला आहे. कांद्याला भाव द्यावा, अशी घोषणाबाजी विधानसभेच्या पायऱ्यांवर विरोधक करत आहेत.
कांदा व कापसाची माळ घालत विरोधकांनी आंदोलन केले. कापूस, कांदा, सोयाबीन, तूर यांना हमीभाव देण्याची मागणी विरोधकांनी केली.
कांदा व कापसाची माळ घालत विरोधकांनी आंदोलन केले. कापूस, कांदा, सोयाबीन, तूर यांना हमीभाव देण्याची मागणी विरोधकांनी केली.

  • तुरुंगातून नुकतेच बाहेर आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख तसेच, विरोधी पक्षनेते अजित पवार, अंबादास दानवे, छगन भुजबळ, आदित्य ठाकरे विधानसभेच्या पायऱ्यांवरील आंदोलनात सहभागी झाले आहेत. कांद्याला भाव मिळालाच पाहीजे, अशी जोरदार घोषणाबाजी करत विरोधकांकडून मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवींचा निषेध केला जात आहे.
  • नाना पटोले म्हणाले, केंद्र व राज्य सरकार मिळून देशातील शेतकऱ्यांना उद्धवस्त करत आहेत. शेतकऱ्यांना त्यांच्या घामाचा पैसा मिळालाच पाहीजे. राज्यात कांदा, तूर, कापूस, सोयाबिनला हमीभाव मिळालाच पाहीजे. मात्र, राज्य सरकारचे धोरण केवळ व्यापाऱ्यांच्या हिताचे आहे. आज अधिवेशनात याबाबत आम्ही सरकारला जाब विचारणार आहोत.
  • मद्य धोरणाद्वारे लिकर लॉबीला कोट्यवधींचा लाभ मिळवून दिल्याचा आरोपाखाली दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदीया सध्या सीबीआय कोठडीत आहे. ज्या पद्धतीने दिल्लीत मनिष सिसोदिया यांनी दारुवाल्यांवर खैरात केल्याचा आरोप आहे, तशीच खैरात त्याच काळात महाराष्ट्रातील तत्कालीन मविआ सरकारने केली होती, असा आरोप भाजप नेते आशिष शेलार यांनी केला आहे.

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री करणार मार्गदर्शन

तसेच, आज शिवसेना व भाजप आमदारांची विधानसभेत बैठक होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या बैठकीला मार्गदर्शन करणार आहे. आमदारांच्या समस्या सोडवण्यासाठी ही बैठक असल्याचे भरत गोगावले यांनी सांगितले आहे. तसेच, या बैठकीत विरोधकांना प्रत्युत्तर कसे द्यायचे याबाबत भाजप व शिवसेनेची रणनितीही ठरण्याची शक्यता आहे.

एका आठवड्यानंतर कारवाई

आज पत्रकार परिषदेत भरत गोगावले म्हणाले, शिवसेनेने आपल्या सर्व 56 आमदारांना व्हीप बजावला आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाला उपस्थित राहून दिवसभर कामकाजात भाग घ्या, असे व्हीपमध्ये आदेश दिलेला आहे. केवळ उपस्थितीसाठी हा व्हीप आहे. सर्वोच्च न्यायालयाने व्हीप संदर्भात ठाकरे गटाला दोन आठवड्याचे संरक्षण दिलेले आहे. त्यातला एक आठवडा संपलेला आहे. आणखी एक आठवडा संरक्षण बाकी आहे. त्यानंतर आमच्या व्हीपचा भंग केल्यास आम्ही कारवाई करू शकतो, असा इशाराही गोगावले यांनी ठाकरे गटाला दिला आहे.

ठाकरे गटाच्या आमदारांसाठी दरवाजे उघडे

भास्कर जाधव यांनी शिंदे गटात सामील होण्यासाठी एकनाथ शिंदे यांना 100 वेळा फोन केला होता, असा खळबळजनक दावा भाजप नेते मोहीत कंबोज यांनी केला आहे. त्यावर भरत गोगावले म्हणाले, भास्कर जाधव यांनी एकनाथ शिंदे यांना फोन केला होता. मोहीत कंबोज जे सांगत आहेत, त्यामध्ये तथ्य आहे. तसेच, ठाकरे गटाच्या सर्व आमदारांसाठी शिवसेनेचे दरवाजे नेहमी उघडे आहेत.