राज्यात बाराशेवर माजी आमदारांच्या कुटुंबांना मिळते ‘पेंशन’

0
34

गोंदिया,दि.16ः संपावर असलेल्या राज्यातील लाखो कर्मचाऱ्यांकडून एक मुद्दा सातत्याने उपस्थित केल्या जात आहे. केवळ पाच वर्षे आमदार राहून आयुष्यभर स्वतः व आपल्या पश्चात जोडीदारास पेन्शनची सोय या नेत्यांनी करून ठेवली आहे. आम्ही आयुष्यभर राबूनही आम्हास पेन्शन का टाळल्या जात आहे, असा सवाल प्रामुख्याने शिक्षक संघटना उपस्थित करतात. खरच मोठी पेन्शन माजी आमदारांना मिळते का? ही शंका दूर करण्यासाठी एका संघटनेने १३ फेब्रुवारी २०२३ ची पेन्शनप्राप्त माजी आमदारांची अद्यावत यादीच व्हायरल केली आहे. त्यानुसार राज्यात विधानपरिषदेचे माजी १४१ आमदार पेन्शनचा लाभ घेत आहे.

राज्यातील एकूण एक हजार तीनशे अकरा माजी आमदार किंवा त्यांच्या कुटुंबात पेन्शनचा पैसा जात आहे. हे संपकर्ते निदर्शनास आणत आहे. या प्रश्नावर प्रत्युत्तर देताना आमदार बच्चू कडू यांनी पेच टाकला. ते म्हणतात की, माझा संपकर्त्यांना प्रश्न आहे की आम्ही पेन्शन सोडले तर तुम्हीही सोडणार का. मात्र, याचे उत्तर अद्याप कुणीही दिलेले नाहीच.

सर्वाधिक पेन्शन रामदास कदम यांना एक लाख चार हजार, त्या पाठोपाठ बी. टी. देशमुख यांना एक लाख रुपये मासिक मिळते. दिवाकर रावते यांना ८६ तर सुभाष देसाई व जगदीश गुप्ता यांना ८४ हजार रुपये मिळतात. उल्हास पवार, अण्णा डांगे, महादेव महाडिक, डॉ. दीपक सावंत, गोपीकिशन बाजोरिया, व्ही.यू. डायगव्हाणे, दिलीप देशमुख यांना ७६ हजार रुपये मासिक मिळतात. वसुधा देशमुख यांना ७२ हजार रुपये मिळतात. उर्वरित आमदारांना ५२ ते ६४ हजार रुपये मासिक पेन्शन मिळत आहे.

विधानसभेच्या ६३४ माजी आमदारांपैकी सर्वाधिक एक लाख सोळा हजार रुपयांची पेन्शन स्वरूपसिंग नाईक यांना मिळत आहे. त्या पाठोपाठ मधुकर पिचड व पदमसिंह पाटील यांना एक लाख दहा हजार, सुरेश जैन एक लाख सहा हजार रुपये, विजयसिंह मोहिते एक लाख दोन हजार रुपये तर प्रकाश मेहता यांना एक लाख रुपये मासिक पेन्शन आहे. उर्वरित माजी आमदारांना ५० ते ९० हजार रुपये दरम्यान पेन्शनचा लाभ होत आहे. या खेरीज दिवंगत ५३५ माजी आमदारांच्या कुटुंबातील विधवा किंवा विधुर यास पेन्शनपोटी ठराविक रक्कम मिळत आहे.