शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानसभेत ग्वाही

0
13

मुंबई, दि. १७: अवकाळी पावसामुळे झालेल्या  नुकसानीचे पंचनामे सुरु आहेत. यासंदर्भात नांदेड, नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्यांना निर्देश दिले आहेत. नियम, निकष डावलून यापूर्वी शेतकऱ्यांना मदत केली आहे, आजही आपण मदत करीत असून हे शेतकऱ्यांचं सरकार आहे, शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत दिली.

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचा मुद्दा आज सकाळी विधानसभेत उपस्थित केला, त्यावर मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते.

अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीसंदर्भात काल नांदेड आणि नाशिक जिल्हाधिकाऱ्यांशी  बोललो आहे, त्यांना तातडीने नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या आहेत, त्यानुसार आज अर्धापूर आणि मुदखेड  या तालुक्यात नांदेड जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पंचनामे करण्याचे काम सुरु आहे तर नाशिक जिल्ह्यात देखील नुकसानग्रस्त भागात पंचनामे सुरू आहेत. या नुकसानीचा अहवाल लवकरच शासनाला प्राप्त होईल.  गेल्या आठवड्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे जवळपास पूर्ण झालेले आहेत, असे सांगून कालपासून ज्या ठिकाणी पाऊस  पडत आहे, त्या भागात देखील  पंचनामे  सुरु असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

वाचाळ मंत्री शेतकऱ्यांची कुचेष्टा करतात, अजित पवारांचा टोला

मुख्यमंत्री कोणाचेही फोन उचलतात असे व्हिडिओ फिरतात. तर त्यांचे वाचाळ मंत्री मात्र आधार देण्याऐवजी शेतकऱ्यांची कुचेष्टा करतात, अशाप्रकारचा टोला विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी आज सभागृहात लगावला. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दादा, तुम्ही काळजी करु नका. शेतकऱ्यांना हे सरकार वाऱ्यावर सोडणार नाही. हे शेतकऱ्यांचे सरकार आहे, असे म्हणत जोरदार प्रत्युत्तर दिले.

अर्थसंकल्पीय अधिवेशनचा तिसरा आठवडा सुरु आहे. अवकाळी मुद्द्यावरून विरोधक सभागृहात आक्रमक झाले आहेत. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळाली अशी मागणी विरोधकांनी केली आहे. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आम्ही शेतकऱ्यांची तातडीने मदत करू असे आश्वासन दिले आहे.

सरकार संवेदनशील आहे का?

अजित पवार म्हणाले, गेल्या 8 दिवसांपासून राज्यात ढगाळ वातावरण आहे. वीजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. फळबागांचे नुकसान झाले. आंबा, काजू यांचे नुकसान झाले आहे. गहू, ज्वारी या पिकांचे नुकसान झाले आहे. सरकार संवेदनशील आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

सत्तार उलट्या काळजाचे

अजित पवार पुढे म्हणाले, अवकाळीवरुन मंत्री अब्दुल सत्तार म्हणाले होते की, शेतकऱ्यांचे जास्त नुकसान झालेले नाही. असे तारेही त्यांनी तोडले. स्वतःच्या सिल्लोड मतदारसंघाबाबत तरी त्यांनी एवढ्या उलट्या काळजाचे व्हायला नको होते. इथे मुख्यमंत्री कोणाचेही फोन उचलतात असे व्हिडिओ फिरतात. मात्र त्यांचे वाचाळ मंत्री मात्र आधार देण्याऐवजी शेतकऱ्यांची अशाप्रकारे कुचेष्टा करतात.