देसाईगंज-धावत्या दुचाकीवर वीज कोसळल्याने पती, पत्नीसह दोन चिमुकल्या मुली जागीच ठार झाल्या. ही घटना आज संध्याकाळी पावणे सहा वाजताच्या सुमारास देसाईगंज-कुरखेडा मार्गावरील दूध डेअरीजवळ घडली.भारत राजगडे (३२), अंकिता राजगडे (३०), चिऊ राजगडे (२), देवाशी राजगडे (३) सर्व रा. आमगाव, ता. देसाईगंज, अशी मृतांची नावे आहेत.
भारत राजगडे हे आपल्या कुटुंबीयांसह कुरखेडा तालुक्यातील तळेगाव येथे एका कार्यक्रमासाठी दुचाकीने गेले होते. कार्यक्रम आटोपून परत येताना देसाईगंजनजीकच्या दूध डेअरीजवळ अचानक दुचाकीवर वीज कोसळली. यात चौघेही जागीच गतप्राण झाले. माहिती मिळताच देसाईगंज पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.





