‘साशा’, ‘उदय’नंतर आता दक्षाचा मृत्यू

0
9

शात मोठा गाजावाजा करुन राबवण्यात आलेल्या चित्ता प्रकल्पाला लागलेले ग्रहण अजूनही सुटायला तयार नाही. आधी ‘साशा’, नंतर ‘उदय’ आणि आता  ‘दक्षा’ या चित्त्याच्या मृत्यूने या प्रकल्पावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. एका तज्ज्ञ वन्यजीव शास्त्रज्ञांच्या सूचनांकडे केलेले दुर्लक्ष चित्त्यांच्या मुळावर उठले आहे. दक्षिण आफ्रिकेतून मध्यप्रदेशच्या कुनो राष्ट्रीय उद्यानात स्थलांतरित झालेल्या मादी चित्ता ‘दक्षा’चा मंगळवारी मृत्यू झाला. यापूर्वी २७ मार्चला ‘साशा’ ही मादी चित्ता, २३ एप्रिलला ‘उदय’ या नर चित्त्याच्या मृत्यू झाला होता. कुनो राष्ट्रीय उद्यानातील हा तिसरा मृत्यू आहे. मंगळवारी सकाळी उद्यानाच्या देखरेख पथकाला ‘दक्षा’ जखमी अवस्थेत आढळली.

तिच्यावर तातडीने औषधोपचार करण्यात आले, पण दुपारी १२ च्या सुमारास तिचा मृत्यू झाला. नुकतेच पाच चित्त्यांना विलगीकरणातून खुल्या पिंजऱ्यात सोडण्यात आले होते. ‘दक्षा’ला पहिल्या क्रमांकाच्या खुल्या पिंजऱ्यात आणि ‘वायू’ व ‘अग्नी’ या दोन नर चित्त्यांना विणीसाठी म्हणून तिच्या पिंजऱ्यात सोडण्यात आले. मात्र, या प्रक्रियेदरम्यान ते हिंसक झाले आणि यात ‘दक्षा’चा मृत्यू झाला. मध्यप्रदेशच्या वनखात्याने दिलेल्या या कारणांवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. चित्ता प्रकल्पाचे प्रमुख असलेले डॉ. यजुवेंद्रदेव झाला यांनी या प्रकल्पाच्या सुरुवातीलाच यातील धोके सांगितले होते. कुनोचे जंगल २० चित्त्यांकरिता लहान असल्याने काही चित्त्यांना राजस्थानच्या मुकुंद्राच्या जंगलात पाठवण्यास देखील त्यांनी सुचवले.

येथील खाद्य चित्त्यांसाठी पुरेसे नाही, ही बाब देखील त्यांनी अधोरेखित केली होती. मात्र, त्यांच्या या सूचना डावलत त्यांनाच या प्रकल्पातून बाहेर करण्यात आले. मध्यप्रदेश हे चित्त्यांचे राज्य म्हणून ओळखले जावे, या एकाच हट्टावर सरकार अडून राहिले. राजस्थानमध्ये काँग्रेसचे राज्य असल्याने तेथे चित्ते पाठवले तर हा मान हिरावला जाईल, म्हणून डॉ. झाला यांच्या सूचना डावलण्यात आल्या. आता हीच बाब चित्त्यांच्या मुळावर उठली आहे. त्यातही चित्त्यांची संख्या वाढवण्यासाठी ते येथील वातावरणात रुळण्यापूर्वीच त्यांना विणीसाठी एकत्र सोडण्याची घाई सरकारने केली. परिणामी, यात ‘दक्षा’ या मादी चित्त्याचा बळी गेल्याचे बोलले जात आहे.