कर्नाटकमध्ये सुरुवातीचे 200 कल हाती, काँग्रेस आणि भाजपमध्ये काँटे की टक्कर

0
8

कर्नाटक राज्याच्या दृष्टीनं आजचा दिवस महत्वाचा आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या (Karnataka Assembly Election Result) मतमोजणीला सुरुवात झाली आहे. सुरुवातीचे काही कल हाती आले आहेत. जवळपास 200 जागांचे कल हाती आले आहेत. यामध्ये काँग्रेस आणि भाजपमध्ये काँटे की टक्कर पाहायला मिळत आहे. कर्नाटक विधानसभेच्या सुरुवातीच्या कलात काँग्रेसला बहुमत मिळालं आहे. काँग्रेस 115 जागांवर आघाडीवर आहे. तर भाजप 80 जागांवर आघाडीवर आहे.  कल सातत्यानं बदलत आहेत.

आजचा दिवस खूप महत्वाचा असणार आहे. कारण  आज कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. कर्मनाटकची जनतेनं कोणाच्या पारड्यात मताचा कौल टाकला ते आज स्पष्ट होमार आहे. कर्नाटकात काँग्रेस बाजी मारणार की भाजप सत्तेत कायम राहणार याचा फैसला अवघ्या काही तासांवर आला आहे. आज दुपारपर्यंत हा निकाल स्पष्ट होण्याची शक्यता आहे. तर बेळगावातील 18 मतदारसंघातील निकाल हे दुपारी दोन वाजेपर्यंत जाहीर होतील.

कर्नाटकातील 224 जागांसाठी 10 मे रोजी निवडणूक झाली. कर्नाटकातील निवडणुकीसाठी 72.67 टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. कर्नाटकातील विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्षांनी सुमारे महिनाभर प्रचार केल्यानंतर आता राज्यातील जनता सत्तेच्या चाव्या कुणाकडे देणार आज ठरणार आहे. भाजप सत्ता कायम ठेवणार की काँग्रेस सत्तेत येणार हे अवघ्या काही तासांमध्ये ठरणार आहे.

2,615 उमेदवारांचे भवितव्य मतदान पेटीत बंद

विधानसभा निवडणुकीसाठी एकूण 2,615 उमेदवार उभे आहेत. त्यामध्ये 2,430 पुरुष तर 184 महिला उमेदवार आणि एक तृतीयपंथीय उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या सर्व उमेदवारांचे भवितव्य 10 मे रोजी मतदान पेटीत बंद झालं.

बेळगावचा निकाल दुपारी दोन वाजेपर्यंत येणार

बेळगाव जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदारसंघातील मतमोजणीची तयारी पूर्ण झाली आज दुपारी दोन वाजेपर्यंत सगळे निकाल जाहीर होतील अशी माहिती जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी दिली. ही मतमोजणी आरपीडी कॉलेजमध्ये मतमोजणी होणार असून कॉलेज परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

बेळगावमध्ये काँग्रेस आघाडीवर आहे. तेथील 18 जागांपैकी काँग्रेस सहा जागांवर आघाडीवर आहे तर भाजप दोन जागांवर आघाडीवर आहे.

मुख्यमंत्री बसवराज बोम्मई आघाडीवर

Karnataka Election Result : कर्नाटक विधानसभेचे कल हाती येण्यास सुरुवात झाली आहे. यामध्ये भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांमध्ये काँटे की टक्कर पाहायला मिळत आहे. दरम्यान, मुख्यमंत्री बसवराज बोम्मई आघाडीवर आहेत.

काँग्रेसचा रथ कोणीच रोखू शकत नाही

राज्यात बहुमतासाठी 113 जागा आवश्यक आहे. पहिल्या कलात काँग्रेसने 115 जागांवर आघाडी घेऊन बहुमताचा आकडा पार केला आहे. तर भाजप 82 आणि जेडीएस 15 जागांवर आघाडीवर आहे. इतरांनी तीन जागांवर आघाडी घेतली आहे. कल हाती येताच काँग्रेसने ट्विट करून भाजपवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे. कर्नाटकात काँग्रेसचा विजय रथ कोणी रोखू शकत नाही, असं काँग्रेसने आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

शेट्टर पिछाडीवर

या निवडणुकीत भाजप नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार, माजी मुख्यमंत्री सिद्धारमैया आणि जेडीएस प्रमुख एचडी कुमारस्वामी हे निवडणूक लढवत आहेत. हुबळी आणि धारवाडमधून काँग्रेसनेते जगदीश शेट्टर लढत असून या ठिकाणी ते पिछाडीवर आहेत. शेट्टर हे निवडणुकीपूर्वीच भाजपमधून काँग्रेसमध्ये आले होते. तर कर्नाटकातील मराठी बहुल परिसरातील सहा जागांपैकी 3 जागांवर काँग्रेस आघाडीवर आहे.

प्रतिष्ठेची निवडणूक

भाजपसाठी ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह आणि केंद्रीय मंत्र्यांनी कर्नाटकात तळ ठोकला होता. कर्नाटकात पुन्हा सत्ता आणण्यासाठी या नेत्यांनी कंबर कसली होती. पंतप्रधान मोदी यांनी तर बजरंग बलीचा नाराही दिला होता. मात्र, असं असतानाही कर्नाटकात भाजपला अपेक्षित यश मिळताना दिसत नाहीये. दक्षिणेकडील फक्त कर्नाटक राज्यातच भाजपचं सरकार आहे. या राज्यातून सत्ता गेली तर भाजपचं दक्षिण भारतातून उच्चाटन होईल असं चित्र आहे.