तुम्ही निष्ठा गहाण का ठेवली? रोहित पवारांचा पटेल, वळसेंना सवाल; म्हणाले – तुमचे ‘विमान’ जमिनीपेक्षा हवेतच जास्त

0
92

अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडाळीमुळे राज्यात मोठी खळबळ माजली आहे. त्यांच्यासोबत शरद पवार यांचे विश्वासू म्हणून ओळखले जाणारे प्रफुल्ल पटेल, दिलीप वळसे पाटील व छगन भुजबळांसारखे नेतेही गेलेत. यामुळे राजकीय क्षेत्रातील अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

विशेषतः प्रफुल्ल पटेल व दिलीप वळसे पाटील शरद पवारांना सोडून जातील, असे कुणालाही वाटले नव्हते. पण ते गेले. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी गुरुवारी 2 वेगवेगळ्या ट्विटद्वारे शरद पवारांनी प्रफुल्ल पटेल व वळसे पाटलांना काय-काय दिले याचा लेखाजोखा मांडत त्यांच्यावर निशाणा साधला आहे.

विचारधारेला मूठमाती का दिली?

रोहित पवार आपल्या ट्विटमध्ये म्हणाले की, वळसे-पाटील साहेब आदरणीय पवार साहेबांनी स्वतःच्या मुलाप्रमाणे जपलेला नेता म्हणून तुम्हाला महाराष्ट्र ओळखतो. तुमच्यावर तर साहेबांचा सर्वाधिक विश्वास होता. पण अचानक असं काय संकट आलं की, तुम्हाला आपली निष्ठा गहाण ठेवावी लागली. आपल्या विचारधारेला मूठमाती द्यावी लागली, हे महाराष्ट्राला जाणून घ्यायचंय. केवळ सत्तेसाठी अशा प्रकारची बंडखोरी आपल्या सारख्या ज्येष्ठ नेत्यांकडून अपेक्षित नव्हती.

आमचा सह्याद्री प्रत्येक संकटावर मात करेल

प्रत्येक संकटावर मात करण्याची ताकद आमच्या #सह्याद्रीत आहे. सह्याद्रीच्या बाजूने संपूर्ण महाराष्ट्र उभा असून हा सह्याद्री नव्या जोमाने आणि नव्या ताकदीने उभा राहीलच, परंतु वळसे-पाटील साहेब तुम्ही स्वतःला तुमच्या या कृतीबद्दल माफ करू शकणार का?, असा सवाल रोहित पवारांनी वळसेंना केला आहे.

प्रफुल्ल पटेलांनाही केला सवाल

प्रफुल्ल पटेल साहेब मा. पवार साहेबांच्या कृपेने तुम्हाला लोकांमध्ये जायची गरज फार कमी वेळा पडली… जमिनीपेक्षा आपलं ‘विमान’ हवेतच जास्त असायचं आणि बहुतेक वेळा केवळ फॉर्मवर सही करण्यापुरतंच आपलं काम असायचं.. म्हणूनच तर तुम्हाला मतांचं मूल्य आणि साहेबांचं पितृतुल्य प्रेम कधी कळलंच नाही, असे रोहित पवार म्हणाले.

अजित पवार गटाची निवडणूक आयोगाकडे धाव

आता अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्यांच्या निवडणूक चिन्हावर दावा सांगणारी याचिका दाखल केली आहे. निवडणूक आयोगाने काही महिन्यांपूर्वी ज्या आधारावर शिवसेनेची धुरा एकनाथ शिंदे यांच्याकडे सोपवली, त्यानुसारच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवारांना मिळेल.