विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी धनजंय मुंडे

0
9

नागपूर- विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी राष्ट्रवादीचे बीडमधील नेते धनजंय मुंडे यांची निवड निश्चित झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधीमंडळातील सर्व आमदारांची आज सकाळी बैठक पार पडली. त्यात हा निर्णय घेण्यात आला. विरोधी पक्षनेतेपदाचा अर्ज राष्ट्रवादीचे विधान परिषदेतील आमदार धनंजय मुंडे यांचा एकट्याचाच आल्याने त्यांची निवड होणार हे निश्चित झाले आहे. याची थोड्याच वेळात घोषणा होईल.

मराठवाड्यातील दुष्काळाची स्थितीवर आक्रमक पवित्रा घेणे शक्य व्हावे यासाठी तरूण व आक्रमक धनंजय मुंडेंची वर्णी लावण्याचे पक्षाकडून निश्चित झाल्याचे कळते. याचबरोबर पक्षाचे मराठवाड्यात यंदाच्या निवडणुकीत झालेले नुकसान भविष्यात भरून काढणे, बहुजन समाज पक्षासोबत कायम ठेवणे व पंकजा मुंडेंना बीडमध्येच आव्हान निर्माण करणे आदी अंगानी विचार करून धनजंय मुंडेंची निवड अजित पवार व सुनील तटकरे यांनी केल्याचे कळते.

हिवाळी अधिवेशन आजपासून नागपूरमध्ये सुरु झाले आहे. त्यापूर्वी आज सकाळी 9 वाजता राष्ट्रवादीचे गटनेते अजित पवार यांनी आपल्या दोन्ही सभागृहातील आमदारांची बैठक घेतली. यात दोन्ही विधीमंडळात विरोधी पक्षनेतेपदावर दावा करण्याचा निर्णय घेण्यात आला. या संदर्भात विधानसभा अध्यक्ष व विधान परिषदेच्या सभापतींना पक्षाकडून एक निवेदन देण्यात आले आहे. विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी राष्ट्रवादीच्या धनंजय मुंडेंचे नाव आमदारांच्या बैठकीत निश्चित करण्यात आले. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आपल्याकडे हे पद घेण्यास नकार दिला आहे. आपल्याकडे प्रदेशाध्यक्षपद असल्याने इतर नेत्याला संधी द्यावी असे त्यांचे म्हणणे होते. अखेर आज सकाळी ज्येष्ठ नेत्यांच्या बैठकीत मुंडेंचे नाव पुढे करण्यात आले. या बैठकीला पक्षाचे गटनेते अजित पवार, प्रदेशाध्यक्ष तटकरे, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, जयदत्ता क्षीरसागर आदी नेते उपस्थित होते.

दोन्ही सभागृहात विरोधी पक्षनेतेपदावर दावा करण्याचा राष्ट्रवादीने निर्णय घेतला आहे. विधान परिषदेतील 78 सदस्यांपैकी राष्ट्रवादीचे सर्वात जास्त 29 आमदार आहेत. त्यामुळे मुंडे यांची निवड आहे. असे असले तरी विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपद कोणाकडे जाते याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. विधानसभेत काँग्रेसचे 42 तर राष्ट्रवादीचे 41 आमदार आहेत. मात्र, निवडणूकपूर्व आघाडी केलेल्या आमदारांसह राष्ट्रवादीचे 46 आमदार आहे. हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीचे 3 आमदार व रवि राणा व सांगोल्याचे शेकापचे आमदार गणपतराव देशमुख यांना राष्ट्रवादीने पाठिंबा दिला होता. त्याचा आधार घेत राष्ट्रवादीने विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदावर दावा केला आहे. मात्र, आता विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ राठोड काय निर्णय घेतात याकडे लक्ष आहे.