शिर्डी, दि. ३१ :- देशाची अर्थव्यवस्था गतीने वाढत आहे. पुढील तीन वर्षांत भारताची अर्थव्यवस्था जगात तिसऱ्या क्रमांकावर असणार आहे. भारत विकसित राष्ट्र होण्यात सहकार क्षेत्राचे योगदान आहे. देशाच्या सहकार क्षेत्राच्या विकासात महाराष्ट्रातील सहकार चळवळीचे अमूल्य योगदान आहे. असे गौरवोद्गार संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज येथे काढले.
प्रवरानगर येथे सहकार चळवळीचे जनक पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या १२३ व्या जयंतीचे निमित्त साधून देण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय साहित्य आणि कलागौरव पुरस्काराचे वितरण केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रमुख अतिथी होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अमळनेर येथील नियोजित ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष रवींद्र शोभणे होते. व्यासपीठावर महसूल, पशूसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, प्रवरा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सचे कुलपती डॉ. राजेंद्र विखे पाटील, आमदार चंद्रशेखर बावनकुळे, आमदार बबनराव पाचपुते, आमदार संग्राम जगताप, आमदार आशुतोष काळे, अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले, संचालक अण्णासाहेब म्हस्के पाटील, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक बी.जी. शेखर पाटील, जिल्हाधिकारी सिध्दराम सालीमठ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर उपस्थित होते.
“तुम्हा सर्व बंधू-भगिनींना नमस्कार” अशा मराठी भाषेत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी भाषणाला सुरुवात केली. ते पुढे म्हणाले की, देशात सहकार चळवळ यशस्वी झाली आहे. स्वतंत्र सहकार मंत्रालयाच्या माध्यमातून धोरणात्मक निर्णय घेण्यात येत आहेत. शेतकरी उत्पादक कंपन्यांना प्रोत्साहन देण्याचे काम केंद्र सरकार करत आहे. सहकार क्षेत्राला पुनर्जीवित करण्याचे काम शासन करत आहे. संघटित राहून काम करणे हे सहकार चळवळीचे मर्म आहे. सहकारातून समृद्धीकडे हा देशाचा मूलमंत्र आहे.
भारतीय लोकशाही हे सहकाराचे सर्वात मोठे उदाहरण आहे. महिलांच्या आर्थिक व सामाजिक सक्षमीकरणात सहकार क्षेत्राने महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. समाजाला एकसंघ ठेवण्यात कला व साहित्य क्षेत्राची महत्त्वाची भूमिका असते. समाजाला दिशा देण्याचे काम ते करतात, असेही संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितले.
अडचणीत शेतकऱ्यांच्या पाठिशी ठामपणे उभे राहणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, राज्यात पावसाने ओढ दिली आहे. हे सरकार शेतकऱ्यांचे, सर्वसामान्यांचे आहे. अडचणीच्या काळात शासन शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. श्री साईबाबा चरणी चांगला पाऊस पडावा यासाठी साकडे घातले आहे. देशाचे एक कर्तव्यदक्ष संरक्षण मंत्री म्हणून राजनाथ सिंह यांची देशाला ओळख आहे. प्रधानमंत्री व संरक्षणमंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयांमुळे देशाची ताकद निश्चितच वाढली आहे. चीन व पाकिस्तानसारख्या शेजारील राष्ट्रांना आपल्या कणखर शब्दात त्यांनी प्रत्युत्तर दिले आहे. त्यामुळे जगभरात भारताचे नाव आदराने घेतले जात आहे.
सहकार क्षेत्राला पुढे नेण्यासाठी केंद्र सरकारने सहकार मंत्रालय स्थापन केले. सहकार क्षेत्राला दहा हजार कोटींची करमाफी देण्याचा धोरणात्मक निर्णय केंद्र शासनाने घेऊन ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम केले आहे. सहकार चळवळ उभी करणारे विठ्ठलराव विखे पाटील यांनी सहकार चळवळीचे रोपटे लावले त्याचा वटवृक्ष झालेला आपण पाहत आहोत, असेही मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी सांगितले.
श्री. शोभणे म्हणाले की, मराठी संत साहित्यानंतर महात्मा जोतिराव फुले यांनी साहित्यांच्या माध्यमातून गरिबांच्या दुःखाला वाचा फोडली. आमदार श्री. बावनकुळे यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी संरक्षण मंत्री व मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय लाभार्थ्यांचाही विशेष सन्मान करण्यात आला. स्वच्छता भारत मोहिमेंतर्गत ग्रामपंचायतींना चारचाकी वाहनांचे वितरण करण्यात आले. चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही यावेळी आपले मनोगत व्यक्त केले.
प्रारंभी, महसूल मंत्री श्री. विखे पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविकातून या पुरस्कारामागील भूमिका विशद केली. साहित्यिक आणि कलाकारांचा या पुरस्काराने सन्मान करण्याची मिळणारी संधी हा आमचा गौरव असल्याचे त्यांनी सांगितले. खासदार डॉ. विखे पाटील यांनी आभार मानले.
या पुरस्कार्थींचा झाला सन्मान –
यावेळी पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. दिलीप धोंडगे यांनी या पुरस्कारांची घोषणा केली. पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील यांच्या नावाने सर्व पुरस्कार दिले जातात. यामध्ये २०२३ या वर्षासाठी साहित्यसेवा जीवनगौरव पुरस्कार – सोलापूर येथील डॉ. निशिकांत ठकार, प्रबोधन पुरस्कार – पुणे येथील अशोक चौसाळकर यांना समाज प्रबोधन पत्रिकेसाठी देण्यात आला. राज्यस्तरीय उत्कृष्ट साहित्य पुरस्कार – ‘महानुभाव वाड्मय : चिकित्सक समालोचन खंड १ व २ ‘ या ग्रंथासाठी पुणे येथील डॉ. शैलेजा बापट यांना तसेच राज्यस्तरीय विशेष साहित्य पुरस्कार – ‘मूल्यत्रयीची कविता‘ या कविता संग्रहासाठी पुणे येथील विश्वास वसेकर यांना देण्यात आला. नाट्यसेवेबद्दल दिला जाणारा राज्यस्तरीय नाट्यसेवा पुरस्कार – जळगाव येथील शंभू पाटील यांना, तर कला क्षेत्रा कार्याबद्दल दिला जाणारा राज्यस्तरीय कलागौरव पुरस्कार- पुणे येथील वसंत अवसरीकर यांना देण्यात आला. अहमदनगर जिल्हा साहित्य पुरस्कार – ‘श्री ज्ञानेश्वर दर्शन भाग १ व २‘ या ग्रंथाच्या संपादनासाठी श्रीरामपूर येथील डॉ. शिरीष लांडगे यांना, तर अहमदनगर जिल्हा विशेष साहित्य पुरस्कार – ‘भंडारदरा धरण शतकपूर्ती ‘ या पुस्तकासाठी भंडारदरा येथील विकास पवार तर प्रवरा परिसर साहित्य पुरस्कार – ‘ते दिवस आठवून बघ‘ या कवितासंग्रहासाठी कोल्हार येथील डॉ. अशोक शिंदे यांना देण्यात आला. पुरस्कार्थीं ज्येष्ठ साहित्यिक डॉ. ठकार यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले.