मराठी माणसाची वनबलप्रमुखपदी नियुक्ती

0
8

नागपूर : भारतीय वनसेवेतील अधिकारी शैलेश टेंभुर्णीकर यांच्या नियुक्तीने तब्बल दोन दशकानंतर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबलप्रमुख) पदावर एका मराठी माणसाची वर्णी लागली आहे. या नियुक्तीमुळे वनखात्यातील मराठी अधिकाऱ्यांच्या आशा बळावल्या आहेत.

वनबलप्रमुख हे वनखात्यातील सर्वोच्च पद आहे. यापूर्वी या पदावर रवींद्र सुळे, श्री. बल्लाळ या काही मराठी अधिकाऱ्यांची वर्णी लागली होती. मात्र, त्यानंतर भारतीय वनसेवेतील दाक्षिणात्य अधिकाऱ्यांकडेच हे पद राहिले. आता तब्बल २० वर्षांनंतर पुन्हा या पदावर शैलेश टेंभुर्णीकर यांच्या रुपाने एक मराठी अधिकारी लाभल्याने खात्यातील इतर मराठी अधिकाऱ्यांच्या आशा बळावल्या आहेत.

वनबलप्रमुख पदासाठी गुणवत्ता आणि ज्येष्ठता या दोन बाबी तपासल्या जातात. या पदासाठी दावेदार असणारा अधिकारी ज्येष्ठता यादीत समोर असेल, पण गुणवत्ता यादीत जर तो मागे असेल, तर त्याला या पदासाठी पात्र समजले जात नाही. शैलेश टेंभुर्णीकर मात्र ज्येष्ठतेबरोबरच गुणवत्तेतही उजवे ठरले आणि त्यामुळेच त्यांची वनबलप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली.

वनसंरक्षणासाठी २००६ साली त्यांना सुवर्णपदक मिळाले. तर सामाजिक वनीकरण विभागात सहसंचालक असताना जलसंधारण क्षेत्रात केलेल्या कामाचे केंद्र सरकारने कौतुक केले. राज्यात वनीकरणातील कार्बन फायनान्स आणि मूल्यांकन या विषयावर अनेक प्रशिक्षण कार्यक्रम त्यांनी आयोजित केले.भारतीय वनसेवेच्या १९८७ च्या तुकडीतील ते अधिकारी आहेत. स्थापत्य विषयात त्यांनी अभियांत्रिकी पदवी प्राप्त केली आहे. संगणक व्यवस्थापन डिप्लोमा व वानिकी शाखेची पदव्युत्तर पदवी त्यांनी प्राप्त केली आहे.