राज्यमंत्री दादा भुसेंना विधानसभा अध्यक्षांची तंबी,

0
8

नागपूर – अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सोमवारी विधानसभेच्या कामकाजाची सुरुवात नेहमीप्रमाणे दिवंगत नेत्यांना श्रद्धांजली अर्पण करून झाली. दुष्काळ आणि शेतक-यांच्या आत्महत्यांच्या मागणीवरून एकटे पडलेले काँग्रेसचे गटनेते राधाकृष्ण विखे पाटील, राज्यमंत्री दादा भुसे यांना जागेवर बसण्याची अध्यक्षांनी दिलेली तंबी ही कामकाजाची वैशिष्ट्ये म्हणता येतील.

सभागृहाचे कामकाज सकाळी ११ वाजता सुरू झाले. अध्यक्षांनी शोकप्रस्तावाची घोषणा केली तेव्हा विखे पाटील यांनी दुष्काळावर चर्चा घ्यावी अशी मागणी केली. मात्र विरोधी बाकांवरील सदस्यांनी त्यांना पाठिंबा दिला नाही. अध्यक्षांनीही ही मागणी नामंजूर केली. त्यानंतर माजी राज्यपाल मोहम्मद फजल, माजी मुख्यमंत्री बॅ. ए. आर. अंतुले, माजी केंद्रीय मंत्री मुरली देवरा, माजी कामगार मंत्री साबिर शेख यांच्यासह विधिमंडळाच्या माजी २० दिवंगत सदस्यांना सभागृहाने श्रद्धांजली वाहिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेल्या या शोकप्रस्तावावर काँग्रेसचे विखे पाटील, उद्योगमंत्री सुभाष देसाई, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, पतंगराव कदम, अजित पवार, छगन भुजबळ, दिलीप वळसे – पाटील आदी सदस्यांनी अनुमोदन देत आदरांजली वाहिली.

‘तुम्ही मंत्री आहात, जागेवर बसा’
शोकप्रस्ताव सुरू असताना राज्यमंत्री दादा भुसे आपली जागा सोडून मागील रांगेतील सदस्याशी बोलत होते. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडेंच्या लक्षात ही बाब येताच त्यांनी दादा भुसे यांना ‘तुम्ही राज्यमंत्री आहात, जागेवर बसा’ या शब्दांत तंबी दिली. त्याबरोबर लगेच भुसे जागेवर येऊन बसले.