‘आयुष्मान भव:’ मोहीम दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याची संधी – राज्यपाल रमेश बैस

0
5

मुंबई, दि. 14 : देशभरात 17 सप्टेंबर ते 31 डिसेंबर दरम्यान ‘आयुष्मान भव:’ मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेच्या माध्यमातून ‘आयुष्मान आपके द्वार’, आयुष्मान सभा, मेळावे, रक्तदान शिबिर, अवयवदान शिबिर आयोजित करण्यात येणार आहे. ही मोहीम म्हणजे दर्जेदार आरोग्य  सेवा उपलब्ध करून देण्याची संधी असल्याचे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी केले.

‘आयुष्मान भव:’ मोहिमेचा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशपातळीवरील शुभारंभ राजभवन, गांधीनगर (गुजरात) येथून दूरदृश्य संवाद पद्धतीने केला. त्यानंतर ‘आयुष्मान भव:’ मोहिमेचा राज्यस्तरीय कार्यारंभ दिन कार्यक्रमाचे सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजन करण्यात आले. यावेळी राज्यपाल श्री. बैस बोलत होते. कार्यक्रमास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ.तानाजी सावंत, आमदार मनीषा कायंदे, आमदार भरत गोगावले, अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, सचिव नवीन सोना, आरोग्य सेवा आयुक्त धीरजकुमार आदी उपस्थित होते.

राज्यपाल श्री. बैस म्हणाले की, राज्यात सध्या एकूण लोकसंख्येच्या 11.7  टक्के लोकसंख्या वृद्ध आहेत. तसेच 2031 पर्यंत 15 टक्के लोकसंख्या वयोवृद्ध होणार आहे. त्यामुळे समाजाच्या या मोठ्या घटकाला आरोग्य सुविधा पुरविणे आव्हानात्मक ठरणार आहे. त्यासाठी वृद्धांना विविध शासकीय रुग्णालयांमध्ये विशिष्ट वॉर्ड, रुग्णवाहिका असल्या पाहिजेत, त्यांना तातडीने वैद्यकीय मदत उपलब्ध करून देण्यासाठी यंत्रणा उभारली पाहिजे. जगात ‘आयुष्मान भारत’ ही सर्वात मोठी आरोग्य क्षेत्रातील योजना आहे. आयुष्मान भारत योजनेचे कार्ड वितरण पूर्ण करून सर्वांना आरोग्य सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. राज्याचे आरोग्य क्षेत्रातील काम मोठे असून देशात महाराष्ट्र आरोग्याच्या बाबत अव्वल येण्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

आयुष्मान भव:’ मोहिमेत महाराष्ट्र उत्कृष्ट काम करून दाखवेल – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

आपल्याकडे निरोगी आयुष्यासाठी ‘आयुष्मान भव:’ असा आशीर्वाद दिला जातो.  या भावनेतून देशवासीयांच्या निरोगी आयुष्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ‘आयुष्मान भव:’ मोहिमेची सुरूवात राज्यभर करणार आहोत. या मोहिमेत महाराष्ट्र देशामध्ये उत्कृष्ट काम करून नागरिकांना उत्तम आरोग्य सेवा उपलब्ध करून देईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिली.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, राज्यात मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाच्या माध्यमातून नागरिकांना भक्कम आधार देण्यात आला. गेल्या वर्षभरात १०० कोटींपेक्षा जास्त मदत देण्यात आली आहे. सर्व सरकारी हॉस्पिटलमध्ये रुग्णांना मोफत वैद्यकीय सेवा देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजना व आयुष्मान भारत प्रधानमंत्री आरोग्य योजनेअंतर्गत एकत्रितपणे २ कोटी कार्डांचे वाटप करण्यात येणार आहे. आता ५ लाखांपर्यंत आरोग्य संरक्षण मिळणार आहे. महाराष्ट्र आरोग्याच्या क्षेत्रात देशात अग्रेसर असून सर्वसामान्य नागरिकाला केंद्रबिंदू ठेवून आरोग्यविषयक योजना आणि उपक्रम राबविले जात असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. आयुष्मान कार्डच्या माध्यमातून सामान्यांना वेळेत वैद्यकीय उपचार घेणे शक्य होणार असून  यासाठी “आयुष्मान भव” ही महत्वाकांक्षी मोहीम १७ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत राबविली जाणार आहे. मोहिमेत पात्र लाभार्थ्यांचे आयुष्मान कार्ड नोंदणी करून त्याचे वितरण करण्यात येणार आहे.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, ही मोहीम राबवताना  गावपातळीपर्यंत गुणवत्तापूर्वक आरोग्य सेवा देणे गरजेचे आहे. राज्यातील सर्वसामान्य नागरिक केंद्रबिंदू ठेवून आयुष्मान सभा, आयुष्मान मेळावा, अंगणवाडी व प्राथमिक शाळांमधील मुलांची तपासणी, रक्तदान मोहीम, अवयवदान जागृती मोहीम, स्वच्छता मोहीम, १८ वर्षांवरील पुरुषांची आरोग्य तपासणी अशा मोहीमा राबविण्यात येतील. राज्य शासनाने सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सर्व शासकीय रुग्णालयात रुग्णांना वैद्यकीय सेवा, तपासणी  नि:शुल्क करण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षामार्फत गेल्या वर्षभरात ११२ कोटीपेक्षा जास्त  मदत केली आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.

आयुष्यमान ग्रामसभा 2 ऑक्टोंबर रोजी होणार असून ती ‘आयुष्मान भारत’ आरोग्य योजनेच्या जाणीव जागृतीसाठी महत्वपूर्ण ठरणार आहे. आयुष्मान ग्राम सभेमध्ये पात्र लाभार्थ्यांची यादी त्याचबरोबर यापूर्वी ज्या लाभार्थ्याने आयुष्मान भारत जन आरोग्य योजनेचा लाभ घेतला आहे, अशा लाभार्थ्यांची यादी आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत संलग्नित असेलल्या रुग्णालयांची यादी अद्ययावत असावी, अशा सूचनाही देण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

राज्यातील सर्व नागरिकांची आरोग्य तपासणी करणारे महाराष्ट्र देशात पहिले राज्य – प्रा. डॉ. तानाजी सावंत

राज्यात आरोग्य विभागाच्या माध्यमातून गेल्या वर्षभरात अनेक निर्णय घेण्यात आले. सुरुवातीला ‘माता सुरक्षित, तर घर सुरक्षित’ अभियान राबविण्यात आले. अभियानामध्ये ४ कोटी ८२ लाख महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यानंतर ‘सुदृढ बालक – जागरूक पालक’ अभियानात ० ते १८ वर्षे वयोगटापर्यंत लहान मुले, किशोरवयीन मुलांची आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यानंतर आयुष्मान भव: मोहिमेदरम्यान ‘निरोगी आयुष्य तरुणाईचे – वैभव महाराष्ट्राचे’ अभियान राबविण्यात येणार आहे. यामध्ये १८ वर्षे व त्यावरील सर्व पुरुषांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. अशाप्रकारे सर्व नागरिकांची आरोग्य तपासणी करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य असल्‍याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रा. डॉ. सावंत यांनी सांगितले.

मंत्री डॉ. सावंत पुढे म्हणाले, की राज्यात शासकीय रुग्णालयांमधून सर्वांना मोफत उपचार देण्यात येत आहे. हा क्रांतिकारी निर्णय असून खात्यातील सर्व अधिकारी, कर्मचारी स्वत:ला झोकून देवून काम करीत आहे. महात्मा फुले जनआरोग्य योजनेत उपचार मर्यादा दीड लाखाहून पाच लाख रुपये करण्यात आली आहे. याबाबत शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. योजनेत १३५० उपचार मिळणार असून रूग्णालयांची संख्याही वाढविण्यात आली आहे. नवीन ३६० रुग्णालये योजनेत समाविष्ट केले जाणार आहेत. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना प्रथम मुंबईत सुरू करण्यात आला. मुंबईतील दवाखान्याची लोकप्रियतेनंतर संपूर्ण राज्यात आपला दवाखाना सुरू करण्यात आला. राज्यातही आपला दवाखाना यशस्वीरित्या सुरू करण्यात आला आहे. मेळघाटसारख्या दुर्गम भागात आरोग्य व्यवस्था बळकट करण्यासाठी ४३ कलमी कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. राज्याला आरोग्य क्षेत्रात देशात अव्वल करण्यासाठी विभागाच्या माध्यमातून काम होत असल्याची ग्वाहीही त्यांनी दिली.

आरोग्यविषयक ॲप व आरोग्य तपासणी मोहिमेचा शुभारंभ

धर्मादाय रुग्णालयांविषयीचे  आरोग्य आधार ॲप व राज्यातील खासगी आरोग्य संस्थांची नोंदणी करण्यासाठी महाराष्ट्र नर्सिंग होम रजिस्ट्रेशन ॲप, आरोग्यवर्धिनी केंद्रामधील कार्यरत समुदाय आरोग्य अधिकारी यांची दैनंदिन उपलब्धता तसेच कामावर आधारित मोबदल्याची अदायगी याचे सनियंत्रण करण्याकरीता समुदाय आरोग्य अधिकारी ॲपचा मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्याहस्ते कळ दाबून शुभारंभ करण्यात आला.  राज्यात 18 वर्ष व त्यावरील सर्व पुरूषांची आरोग्य तपासणी करण्यात येणाऱ्या ‘निरोगी आयुष्य तरूणाईचे – वैभव महाराष्ट्राचे’ या मोहिमेची सुरूवात करण्यात आली.

क्षयरोगमुक्त भारत अभियानात उल्लेखनीय काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचा सत्कार

क्षयरोगमुक्त भारत अभियान राबवून देशाला 2025 पूर्वी क्षयरोगमुक्त करावयाचे आहे. या अभियानात उल्लेखनीय काम करणाऱ्या नागपूर व  जालना जिल्हा क्षयरोग अधिकारी यांचा सत्कार करण्यात आला. तसेच महानगर क्षेत्रात उत्कृष्ट काम करणारे धुळे व मुंबई शहर जिल्हा क्षयरोग अधिकाऱ्यांनाही सन्मानीत करण्यात आले.  त्याचप्रमाणे निक्षय मित्र म्हणून मॅक्स हेल्थकेअर प्रतिनिधींचा सत्कारही राज्यपाल यांच्या हस्ते करण्यात आला.

अवयवदानाची शपथ

सर्वसामान्य नागरिकांमध्ये अवयव व ऊती दान करण्याबबात जनजागृती करणे आवश्यक आहे.  या राज्यस्तरीय कार्यक्रमात उपस्थित सर्वांना अवयवदानाची शपथ देण्यात आली.  अवयव दान हे सर्वात मोठे आणि पुण्याचे कार्य आहे. आयुष्मान सभेमध्ये याविषयीही जागृती करण्यात यावी, असे आवाहनही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी केले.

कार्यक्रमाला आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचारी, आशा कार्यकर्ता, दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून जिल्हाधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी सहभागी झाले होते.