“भारताच्या 75 वर्षांच्या संसदीय प्रवासाचे पुनःस्मरण करण्याचा आजचा दिवस आहे”

0
6

पंतप्रधानांनी संसदेच्या विशेष अधिवेशनाला लोकसभेत केले संबोधित

“आपण नवीन इमारतीत स्थलांतरित होत आहोत, मात्र ही इमारत भारतीय लोकशाहीच्या प्रवासाचा एक सुवर्ण अध्याय असून भावी पिढीला यापुढेही प्रेरणा देत राहील”

“अमृत काळाच्या पहिल्या प्रकाशात नवा आत्मविश्वास, कर्तृत्व आणि क्षमतांचा अंतर्भाव होत आहे”

“भारताच्या जी 20 अध्यक्षपदाच्या काळात आफ्रिकन महासंघाचा जी 20 मध्ये समावेश केल्याचा भारताला नेहमीच अभिमान वाटेल”

“जी 20 दरम्यान, भारत ‘विश्वमित्र’ म्हणून उदयाला आला”

“सभागृहातील सर्वसमावेशक वातावरणाने जनतेच्या आकांक्षा पूर्ण ताकदीने प्रकट केल्या आहेत”

“मागील 75 वर्षातले सर्वात मोठे यश म्हणजे सामान्य नागरिकांचा संसदेवरील सातत्याने वाढत जाणारा विश्वास आहे ”

संसदेवरील दहशतवादी हल्ला हा भारताच्या आत्म्यावरील हल्ला होता.

“भारतीय लोकशाहीचे सर्व चढ-उतार पाहिलेले आपले हे सभागृह जनतेच्या विश्वासाचा केंद्रबिंदू आहे”

नवी दिल्‍ली, 18 सप्‍टेंबर-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लोकसभेत संसदेच्या विशेष अधिवेशनाला संबोधित केले. हे विशेष अधिवेशन 18 ते 22 सप्टेंबर 2023 या कालावधीत होत आहे.

सभागृहाला संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले की,  नव्याने उदघाटन झालेल्या इमारतीत कामकाज हलवण्यापूर्वी भारताच्या 75 वर्षांच्या संसदीय प्रवासाचे पुनःस्मरण करण्याचा आजचा दिवस आहे. जुन्या संसद भवनाबद्दल बोलताना, पंतप्रधानांनी नमूद केले की भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी ही इमारत इम्पीरियल लेजिस्लेटिव्ह कौन्सिल म्हणून काम करत होती आणि स्वातंत्र्यानंतर भारताची संसद म्हणून ओळखली गेली. ही इमारत बांधण्याचा निर्णय जरी परकीय राज्यकर्त्यांनी घेतला असला, तरी भारतीयांची मेहनत, समर्पण आणि पैसा यामुळेच या वास्तूचा विकास झाला याकडे त्यांनी लक्ष वेधले.

75 वर्षांच्या प्रवासात या सभागृहाने सर्वोत्कृष्ट रूढी  आणि परंपरा निर्माण केल्या आहेत, ज्यामध्ये सर्वांचे योगदान आहे आणि सर्वजण साक्षीदार आहेत.  “आपण जरी नवीन इमारतीत स्थलांतरित होत असलो तरी  ही इमारत भावी  पिढीला यापुढेही प्रेरणा देत राहील. भारतीय लोकशाहीच्या प्रवासाचा हा एक सुवर्ण अध्याय आहे”, असे ते म्हणाले.

अमृत काळातील पहिल्या प्रकाशात नवा आत्मविश्वास, कर्तृत्व आणि क्षमता सर्वत्र आढळत असून जग भारताच्या आणि भारतीयांच्या उज्वल यशाची चर्चा करत आहे असे पंतप्रधानांनी नमूद केले. ते म्हणाले, “आपल्या 75 वर्षांच्या संसदीय इतिहासाच्या सामूहिक प्रयत्नांचा हा परिणाम आहे.”

चांद्रयान 3 च्या यशाबाबत  मोदी म्हणाले की, यातून भारताच्या क्षमतांचा आणखी एक आयाम सर्वासमोर आणला आहे जो आधुनिकता, विज्ञान, तंत्रज्ञान आणि आपल्या वैज्ञानिकांचे सामर्थ्य आणि 140 कोटी भारतीयांच्या शक्तीशी जोडलेला आहे. पंतप्रधानांनी सभागृह आणि देशाच्या वतीने वैज्ञानिकांच्या या कामगिरीचे कौतुक केले.

भूतकाळात अलिप्तता चळवळीच्या शिखर परिषदेच्या वेळी सभागृहाने देशाच्या प्रयत्नांची कशी प्रशंसा केली याची पंतप्रधानांनी आठवण करून दिली आणि अध्यक्षांनी जी 20 च्या  यशाचा उल्लेख केल्याबद्दल आभार मानले. पंतप्रधान म्हणाले की जी 20 चे यश हे 140 कोटी भारतीयांचे यश असून कोणाही विशिष्ट व्यक्ती किंवा पक्षाचे नाही. भारतातील 60 हून अधिक ठिकाणी 200 हून अधिक यशस्वी कार्यक्रमांचे आयोजन  भारताच्या विविधतेच्या यशाचे द्योतक आहे असे त्यांनी  अधोरेखित केले. ‘आफ्रिकन महासंघाचा आपल्या अध्यक्षपदाच्या काळात जी 20 मध्ये समावेश केल्याचा  भारताला नेहमीच अभिमान वाटेल’,असे समावेशाच्या भावनिक क्षणाची आठवण करून देताना त्यांनी सांगितले.

भारताच्या क्षमतांबद्दल शंका निर्माण करण्याच्या काही लोकांच्या नकारात्मक प्रवृत्तीकडे लक्ष वेधून पंतप्रधान म्हणाले की, जी 20 जाहीरनाम्याबाबत सर्वांचे एकमत झाले आणि भविष्यासाठी एक मार्गदर्शक आराखडा येथे तयार करण्यात आला. भारताचे जी 20 अध्यक्षपद नोव्हेंबर अखेरपर्यंत आहे आणि त्याचा पुरेपूर वापर करण्याचा देशाचा मानस असल्याचे त्यांनी अधोरेखित केले आणि पंतप्रधानांच्या  अध्यक्षतेखाली P20 शिखर परिषद (संसदीय 20) आयोजित करण्याच्या अध्यक्षांच्या प्रस्तावाला अनुमोदन दिले.

“भारताने ‘विश्वमित्र’ म्हणून स्वतःचे एक स्थान निर्माण केले आहे आणि संपूर्ण जग भारताकडे एक मित्र म्हणून पाहत आहे, ही सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे. वेदांपासून ते विवेकानंदांसारख्या महानुभवांकडून आपल्याला मिळालेले  ‘संस्कार ’  त्यासाठी कारणीभूत आहेत.  सबका साथ सबका विकास हा मंत्र जगाला आपल्यासोबत आणण्यासाठी आपल्याला एकत्र करत आहे.

नवीन घरात स्थलांतरित झालेल्या कुटुंबाशी साधर्म्य साधत पंतप्रधान म्हणाले की, जुन्या संसद भवनाला निरोप देणे हा खूप भावनिक क्षण आहे. इतक्या  वर्षात सभागृहाने पाहिलेल्या विविध अभिवृत्तीचे त्यांनी स्मरण  केले आणि या आठवणी सदनातील सर्व सदस्यांचा जपलेला वारसा असल्याचे त्यांनी सांगितले. “हे वैभवही आपलेच आहे”, असे ते म्हणाले. या संसद भवनाच्या 75 वर्षांच्या इतिहासात राष्ट्राने नव्या भारताच्या निर्मितीशी संबंधित असंख्य घटना पाहिल्या आहेत आणि आज भारतातील सामान्य नागरिकांबद्दल आदर व्यक्त करण्याची संधी आहे, असे त्यांनी नमूद केले.

पहिल्यांदा खासदार म्हणून संसदेत आल्यांनतर त्यांनी संसदेच्या इमारतीला नतमस्तक होऊन नमस्कार केल्याची आठवण पंतप्रधानांनी सांगितली. हा एक भावनिक क्षण होता आणि याची कल्पनाही केली नव्हती असे सांगत पंतप्रधान म्हणाले की , “रेल्वे स्थानकावर उदरनिर्वाह करणार्‍या गरीब मुलाने संसदेत पोहोचणे ही भारताच्या लोकशाहीची ताकद आहे. देशाकडून मला इतके प्रेम, आदर आणि आशीर्वाद मिळेल याची मी कल्पनाही केली नव्हती,” असे ते म्हणाले.

संसदेच्या प्रवेशद्वारावर कोरलेले उपनिषदातील वाक्य उद्धृत करून, पंतप्रधान म्हणाले की, ऋषीमुनींनी सांगितले की लोकांसाठी दरवाजे खुले करा आणि ते त्यांचे हक्क कसे मिळवतात ते पहा. सभागृहाचे आजी आणि माजी सदस्य या वाक्याच्या सत्यतेचे साक्षीदार आहेत, असे मोदी म्हणाले.

कालांतराने सदनाची बदलती रचना अधिक सर्वसमावेशक होत गेली आणि समाजातील सर्व घटकांमधील प्रतिनिधी सभागृहात येऊ लागले, यावर पंतप्रधानांनी प्रकाश टाकला. “सर्वसमावेशक वातावरणाने लोकांच्या आकांक्षा संपूर्ण शक्तीने अभिव्यक्त केल्या आहेत”, असे ते म्हणाले. सभागृहाची प्रतिष्ठा वाढवण्यात मदत करणाऱ्या महिला खासदारांचे  योगदान पंतप्रधानांनी नमूद केले.

ढोबळ अंदाज वर्तवत, दोन्ही सभागृहात 7500 हून अधिक लोकप्रतिनिधींनी काम केले असून महिला प्रतिनिधींची संख्या अंदाजे 600 आहे, अशी माहिती पंतप्रधानांनी दिली. इंद्रजित गुप्ताजींनी या सदनात जवळपास 43 वर्षे सेवा केली आहे आणि शफीकुर रहमान यांनी वयाच्या 93 व्या वर्षापर्यंत सेवा बजावली आहे, अशी माहितीही त्यांनी दिली. वयाच्या 25 व्या वर्षी सभागृहात निवडून आलेल्या चंद्राणी मुर्मू यांचाही त्यांनी उल्लेख केला.

इथे कटुता कधीही टिकत नाही त्यामुळे मतभिन्नता आणि उपरोध असूनही सभागृहात कौटुंबिक भावना असणे हा सभागृहाचा प्रमुख गुणधर्म आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले. गंभीर आजार असूनही, महामारीच्या कठीण काळातही सदनाचे सदस्य त्यांचे कर्तव्य बजावण्यासाठी सभागृहात कशाप्रकारे आले होते याचेही स्मरण त्यांनी केले.

स्वातंत्र्यानंतरच्या सुरुवातीच्या काळात नव्या राष्ट्राच्या व्यवहार्यतेबद्दल असलेल्या साशंकतेची आठवण करून देत पंतप्रधान म्हणाले की, सर्व शंका चुकीच्या ठरल्या, ही संसदेची ताकद आहे.

याच सभागृहात 2 वर्षे 11 महिने संविधान सभेच्या बैठका झाल्या आणि राज्यघटनेचा स्वीकार झाला आणि ती लागू करण्यात आली याचे स्मरण करत, “संसदेवरील सामान्य नागरिकांचा सातत्याने वाढत जाणारा विश्वास हे 75 वर्षातील सर्वात मोठे यश आहे”, असे पंतप्रधान म्हणाले. डॉ राजेंद्र प्रसाद, डॉ कलाम ते रामनाथ कोविंद ते द्रौपदी मुर्मू यांच्या राष्ट्रपती पदावरील अभिभाषणांचा सदनाला लाभ मिळाला, असे त्यांनी सांगितले.

पंडित नेहरू आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या काळापासून ते अटलबिहारी वाजपेयी आणि मनमोहन सिंह यांच्या काळाचा संदर्भ देत, पंतप्रधान म्हणाले की, त्यांनी त्यांच्या नेतृत्वाखाली देशाला नवी दिशा दिली आणि आज त्यांचे कर्तृत्व अधोरेखित करण्याची संधी आहे. सभागृहातील चर्चा समृद्ध करणाऱ्या आणि सामान्य नागरिकांच्या आवाजाला बळ देणाऱ्या  सरदार वल्लभभाई पटेल, राम मनोहर लोहिया, चंद्रशेखर, लालकृष्ण अडवाणी आणि इतरांच्या कार्यकर्तृत्वालाही त्यांनी स्पर्श केला. पंतप्रधान मोदी यांनी सभागृहातील विविध परदेशी नेत्यांच्या भाषणावर देखील प्रकाश टाकला. यातून त्यांच्या भारताविषयीचा आदर दिसून आला, असे ते म्हणाले.

नेहरूजी, शास्त्रीजी आणि इंदिराजी पंतप्रधान पदावर असताना देशाने तीन पंतप्रधान गमावले तेव्हाच्या वेदनादायी क्षणांचीही त्यांनी आठवण करून दिली.

अनेक आव्हाने असतानाही सभापतींनी सदनाचे कामकाज सुरळीतपणे चालवले याची आठवणही पंतप्रधानांनी करून दिली. त्यांनी त्यांच्या निर्णयांमधून   संदर्भ बिंदू तयार केले, असे त्यांनी सांगितले. 2 महिलांचा समावेश असलेल्या 17 सभापतींनी, मावळणकर ते सुमित्रा महाजन ते ओम बिर्ला यांसारख्या सभापतींनी सर्वांना सोबत घेऊन आपापल्या मार्गाने योगदान दिल्याचे त्यांनी स्मरण केले. संसदेच्या कर्मचाऱ्यांचे योगदानही पंतप्रधानांनी अधोरेखित केले.

संसदेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याची आठवण करून देताना पंतप्रधान म्हणाले की, हा संसदेच्या इमारतीवरील हल्ला नव्हता तर तो लोकशाहीच्या जननीवर झालेला हल्ला होता. हा भारताच्या आत्म्यावर केलेला हल्ला होता”. सदनातील सदस्यांचे संरक्षण करण्यासाठी ज्यांनी दहशतवाद्यांशी दोन हात केले त्यांचे योगदान अधोरेखित करत त्यांनी  शूरवीरांना श्रद्धांजली अर्पण केली.

अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर न करताही संसदेच्या कामकाजाचे वार्तांकन करण्यासाठी आपले जीवन समर्पित करणाऱ्या पत्रकारांचेही पंतप्रधानांनी स्मरण केले. त्यांनी नमूद केले की जुन्या संसदेला निरोप देणे त्यांच्यासाठी आणखी कठीण काम असेल कारण ते संसद सदस्यांपेक्षाही अधिक या वास्तूशी जोडलेले आहेत.

नाद ब्रह्माच्या अनुष्ठानावर प्रकाश टाकून पंतप्रधान म्हणाले की  एखाद्या परिसरात सतत होणाऱ्या मंत्रोच्चारामुळे ते ठिकाण  तीर्थक्षेत्र बनते. तेव्हा या वास्तूत होणारी चर्चा थांबली असली तरीही 7500 लोकप्रतिनिधींच्या प्रतिध्वनीमुळे ती तीर्थक्षेत्र बनली आहे.

“संसद हे असे स्थान आहे  आहे जिथे भगतसिंग आणि बट्टुकेश्वर दत्त यांनी आपल्या शौर्याने आणि धैर्याने ब्रिटीशांमध्ये दहशत निर्माण केली होती”, अशी टीप्पणी पंतप्रधानांनी केली. पंडित जवाहरलाल नेहरूंच्या देश स्वतंत्र झाला त्या मध्यरात्रीच्या भाषणाचे ‘स्ट्रोक ऑफ मिडनाईट’चे प्रतिध्वनी भारतातील प्रत्येक नागरिकाला सतत प्रेरणा देत राहील, असे त्यांनी नमूद केले. त्यांनी अटलबिहारी वाजपेयी यांच्या प्रसिद्ध भाषणाची आठवण करून दिली आणि उद्धृत केले, “सरकारे  येतील आणि जातील. राजकीय पक्ष बनतील आणि विखंडित होतील. मात्र, हा देश टिकला पाहिजे, लोकशाही टिकली पाहिजे.”

पहिल्या मंत्रिमंडळाचे  स्मरण करून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बाबासाहेब आंबेडकरांनी देशाच्या राज्यघटनेत जगभरातील सर्वोत्तम पद्धतींचा समावेश कसा केला होता याचे स्मरण केले. बाबासाहेबांनी नेहरू मंत्रिमंडळात तयार केलेल्या उत्कृष्ट जलनीतीचाही त्यांनी उल्लेख केला. बाबासाहेबांनी दलितांच्या सक्षमीकरणासाठी औद्योगिकीकरणावर दिलेला भर आणि डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांनी पहिले उद्योगमंत्री म्हणून पहिले औद्योगिक धोरण कसे आणले याचाही पंतप्रधानांनी उल्लेख केला.

1965 च्या युद्धात लाल बहादूर शास्त्री यांनी भारतीय सैनिकांच्या चेतनेला प्रोत्साहन दिले ते याच वास्तूत,  याची त्यांनी आठवण करून दिली. शास्त्रीजींनी रचलेल्या हरित क्रांतीच्या पायाचाही त्यांनी उल्लेख केला. इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखाली बांगलादेशच्या स्वातंत्र्याची लढाईही याच सभागृहामुळे शक्य झाली होती, असे त्यांनी अधोरेखित केले. आणीबाणीच्या काळात लोकशाहीवर झालेला हल्ला आणि आणीबाणी उठवल्यानंतर लोकांच्या सत्तेचे  पुनरुत्थान याचाही त्यांनी उल्लेख त्यांनी केला.

माजी पंतप्रधान चरण सिंह यांच्या नेतृत्वाखाली ग्रामीण विकास मंत्रालयाच्या स्थापनेचा पंतप्रधानांनी उल्लेख केला. “मतदानाचे वय 21 वरून 18 पर्यंत कमी करण्याचा निर्णयही याच सभागृहात घेण्यात आला”, असे पंतप्रधानांनी सांगितले. जेव्हा देश आर्थिक संकटात सापडला होता तेव्हा पीव्ही नरसिंह राव यांच्या नेतृत्वाखाली देशाने नवीन आर्थिक धोरणे आणि उपाय स्वीकारल्याचे त्यांनी स्मरण केले. त्यांनी अटलजींच्या ‘सर्व शिक्षा अभियान’, आदिवासी व्यवहार मंत्रालयाची स्थापना आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आण्विक युगाविषयीही सांगितले. पंतप्रधानांनी सभागृहाने पाहिलेल्या ‘कॅश फॉर व्होट्स’ घोटाळ्याचा देखील उल्लेख केला.

अनेक दशकांपासून प्रलंबित असलेले ऐतिहासिक निर्णय निकाली काढण्याबाबत पंतप्रधानांनी कलम 370, वस्तू आणि सेवा कर, वन रँक वन पेंशन आणि गरिबांसाठी 10 टक्के आरक्षण यावर प्रकाश टाकला.

पंतप्रधान म्हणाले की, हे सदन लोकांच्या विश्वासाचे साक्षीदार आहे आणि लोकशाहीच्या चढ-उतारांदरम्यान ते लोक विश्वासाचे केंद्र राहिले आहे. अटलबिहारी वाजपेयी यांचे सरकार एका मताने पडल्याचा प्रसंग त्यांना आठवला. विविध क्षेत्रीय पक्षांचा उदय हा आकर्षणाचा बिंदू असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.

पंतप्रधानांनी अटलजींच्या नेतृत्वात छत्तीसगड, उत्तराखंड आणि झारखंड या 3 नवीन राज्यांच्या निर्मितीवर प्रकाश टाकला आणि तेलंगणाच्या निर्मितीमध्ये सत्ता बळकावण्याच्या प्रयत्नांवर खेद व्यक्त केला. त्या काळात दोन्ही राज्यात कोणतेही उत्सव साजरे झाले नाहीत कारण विभाजन दुर्भावनापूर्ण हेतूने केले गेले होते, असेही त्यांनी निदर्शनास आणून दिले.

संविधान सभेने आपला दैनंदिन भत्ता कसा कमी केला आणि सभागृहाने आपल्या सदस्यांसाठी कॅन्टीनचे अनुदान कसे काढून टाकले याची पंतप्रधानांनी आठवण करून दिली. तसेच, संसद सदस्यांनी  त्यांच्या संसद सदस्य स्थानिक क्षेत्र विकास योजना (MPLAD) निधीतून कोविड महामारीच्या काळात राष्ट्राला मदत करण्यात  पुढाकार  घेतला आणि त्यांची 30 टक्के वेतन कपात मान्य केली, असेही पंतप्रधानांनी सांगितले. लोकप्रतिनिधी कायद्यात बदल करून सभासदांनी स्वतःला कशी शिस्त लावली, याचाही उल्लेख त्यांनी केला.

उद्या संसद भवनाच्या जुन्या इमारतीला निरोप देताना पंतप्रधानांनी अधोरेखित केले की सभागृहातील उपस्थित सदस्य अत्यंत भाग्यवान आहेत कारण त्यांना भविष्य आणि भूतकाळाचा दुवा बनण्याची संधी मिळत आहे. “आजचा प्रसंग हा 7500 प्रतिनिधींसाठी अभिमानाचा क्षण आहे ज्यांनी संसदेच्या या वास्तूमधुन प्रेरणा घेतली आहे”, असे पंतप्रधान पुढे म्हणाले.

भाषणाचा समारोप करताना, पंतप्रधानांनी विश्वास व्यक्त केला की संसद सदस्य मोठ्या उत्साहाने आणि चैतन्याने नवीन इमारतीत प्रवेश करतील. भविष्याच्या तेजस्वी प्रकाशात जुन्या संसद सदनातील ऐतिहासिक क्षणांची आठवण करून देण्याची संधी दिल्याबद्दल त्यांनी अध्यक्षांचे आभार मानले.