सोलापूर-तुरुंगात असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे विद्यमान मंत्री छगन भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना ब्लॅकमेल करायचे, असा खळबळजनक दावा माजी आमदार रमेश कदम यांनी केला. ते माध्यमांशी संवाद साधत होते. कदम यांची नुकतीच जामिनावर सुटका झाली आहे. अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळात भ्रष्टाचार केल्याप्रकरणी कदम जेलमध्ये होते.
शरद पवारांबद्दल नाराजी व्यक्त करायचे
रमेश कदम यांनी म्हटले, छगन भुजबळ शरद पवार यांना जेल मधून ब्लॅकमेल करायचे. जामिनासाठी भुजबळांची धडपड सुरू होती. आपला जामीन झाला नाही तर मला वेगळा मार्ग स्वीकारावा लागेल असा इशारा देत भुजबळ त्यांना ब्लॅकमेल करत असत असा दावा कदम यांनी केला. भुजबळ जेव्हा तुरुंगात होते. तेव्हा त्यांच्यांशी माझी भेट होत असे. त्यावेळी भुजबळ हे पवार साहेबांनी मला मदत केली पाहिजे. जामिनाला खूपच उशीर होत आहे, असे म्हणतं नाराजी देखील बोलून दाखवायचे.
जेलमध्ये असतानाच भुजबळांची छाती दुखायची
सत्तेतील आताचे छगन भुजबळ आणि तुरुंगामध्ये असतानाचे छगन भुजबळ याच्यात खूप फरक आहे. जेलमध्ये ते रोज आजारी पडायचे. काकूळतीला यायचे त्यांना रोज उपचाराची गरज होती. जेल मधून बाहेर आल्यापासून आम्ही बातमी ऐकली नाही छगन भुजबळ यांच्या छातीत दुखतंय, असेही कदम यांनी म्हणत भुजबळांना टोला लगावला. जेलमध्ये गेलं की लोक आजारी पडतात त्यांना माहीत आहे. सहानुभूती मिळवून कसा जामिन मिळवायचा हे देखील त्यांना माहित आहे. परंतु जेल ही कोणाच्या नशिबात येऊ नये नरक आहे, असेही कदम म्हणाले.
अ.भा.साठे महामंडळात 312 कोटींचा घोटाळा
माजी आमदार रमेश कदम यांच्यावर अण्णा भाऊ साठे महामंडळामध्ये 312 कोटी रुपयांच्या घोटाळा केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. त्या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल केल्यानंतर त्यांची रवानगी तुरुंगात करण्यात आली होती. तर न्यायमूर्ती राहुल रोकडे यांनी त्यांना सर्व गुन्ह्यांमध्ये जामीन मंजूर केला. रमेश कदम यांना जामीन मिळाल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी जल्लोष केला. मोहोळ मध्ये परतल्यानंतर कदम यांचे त्यांच्या समर्थकांनी जंगी स्वागत केले. कदम यांनी तूर्तास कोणतीही राजकीय भूमिका स्पष्ट केली नाही.
तुरुंगात असताना कदम सापडले होते वादात
दरम्यानच्या काळात या ना त्या कारणानं रमेश कदम सतत चर्चेत राहिलेत. मागे एका व्हिडीओ क्लीपमध्ये कदम आर्थर रोड जेलमध्ये कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांना शिवीगाळ करत असल्याचं दिसलं होतं. त्यासंदर्भात रमेश कदम यांच्याविरोधात नागपाडा पोलिस स्टेशनमध्ये गुन्ह्यांची नोंद करण्यात आली. मात्र, ‘पोलिसांनीच मला जातीवाचक शिवीगाळ केली आणि 25 हजारांची लाच मागितली’ असा त्यांचा दावा होता. तसेच भायखळा जेलमध्ये असताना वॉर्डन मंजुळा शेट्ये हत्या प्रकरणातही रमेश कदम यांनी पोलिसांवर आरोप केले होते.