गंगटोक –सिक्कीममध्ये ढगफुटीनंतर तीस्ता नदीला अचानक आलेल्या पुरामुळे 23 जवान बेपत्ता झाले. संरक्षण पीआरओच्या म्हणण्यानुसार, मंगळवारी पहाटे 1.30च्या सुमारास ल्होनाक तलावावर ढग फुटले होते, त्यानंतर लाचेन खोऱ्यातील तीस्ता नदीला अचानक पूर आला होता.
नदीलगतच्या परिसरात लष्कराची छावणी होती, ती पुराच्या तडाख्यात वाहून गेली. गुवाहाटीचे संरक्षण पीआरओ म्हणाले- अचानक पाणी वाढल्याने चुंगथांग धरणातून पाणी सोडावे लागले. यानंतर सखल भागही बुडू लागला. येथे सिंगतामजवळील बारडांग येथे उभी असलेली 41 लष्कराची वाहने बुडाली.
लष्कराच्या म्हणण्यानुसार, ढगफुटीच्या घटनेनंतर तीस्ता नदीच्या पाण्याची पातळी अचानक 15 ते 20 फुटांनी वाढली. यानंतर नदीलगतचा परिसर जलमय झाला. नदीचे पाणीही अनेक घरात शिरले. लोक घरे सोडून सुरक्षित ठिकाणी गेले.

बचावकार्य सुरू
गुवाहाटीचे संरक्षण पीआरओ म्हणाले की, या घटनेनंतर बेपत्ता लष्करी जवानांच्या शोधासाठी बचाव मोहीम सुरू करण्यात आली आहे. स्थानिक प्रशासनही आपल्या स्तरावर बचावकार्य करत आहे. मात्र जीवित व वित्तहानीबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

16 जून रोजीही ढगफुटी
यापूर्वी 16 जून रोजीही सिक्कीममध्ये ढग फुटले होते. येथे पाकयोंगमध्ये भूस्खलन आणि नंतर ढग फुटल्यामुळे घरे भरून गेली. याचा फटका अनेकांना बसला.

आज आणि उद्या पूर्वोत्तर राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा
भारतीय हवामान खात्याने पूर्व आणि ईशान्येकडील राज्यांमध्ये 4 आणि 5 ऑक्टोबरला मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. यामध्ये बिहार, झारखंड, ओडिशा, पश्चिम बंगाल, सिक्कीम, आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरा यांचा समावेश आहे.

