नवी दिल्ली -भारतीय निवडणूक आयोगाने आज मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, मिझोराम आणि तेलंगणा या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी पाच राज्यांतील निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत.
छत्तीसगडमध्ये दोन टप्प्यात निवडणुका होणार आहेत. पहिल्या टप्प्यासाठी 7 नोव्हेंबरला तर दुसऱ्या टप्प्यासाठी 17 नोव्हेंबरला मतदान होणार आहे.
मध्य प्रदेशमध्ये 17 नोव्हेंबरला आणि मिझोराममध्ये 7 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. तर राजस्थानमध्ये 23 नोव्हेंबरला मतदान होणार आहे आणि तेलंगणामध्ये 30 नोव्हेंबरला एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. पाचही राज्यांचे निवडणूक निकाल 3 डिसेंबरला लागतील. तारखा जाहीर झाल्यानंतर या राज्यांमध्ये निवडणूक आचारसंहिता लागू झाली आहे.
पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपसाठी या पाच विधानसभा निवडणुका महत्त्वाच्या ठरणार आहेत. विशेष म्हणजे, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेसचे सरकार आहे. मध्यप्रदेशात भाजपचे सरकार आहे आणि तेलंगणात बीआरएसचे सरकार आहे. मिझोराममध्ये मिझो नॅशनलच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेवर आहे.
दरम्यान, 2018 च्या मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने विजय संपादन केला होता. त्यावेळी कमलनाथ मुख्यमंत्री बनले होते. तब्बल दीड वर्षानंतर ज्योतिरादित्य सिंधिया यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्यासह अनेक समर्थक आमदारांनीही पक्ष सोडला आणि काँग्रेसचे सरकार पडले. त्यानंतर 2020 मध्ये शिवराज सिंह चौहान यांच्या नेतृत्वाखालील भाजपचे सरकार स्थापन झाले.
दरम्यान, 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीपूर्वी पाच राज्यांतील निवडणुकांकडेही सेमीफायनल म्हणून पाहिले जात आहे. एकीकडे मध्य प्रदेशात विधानसभेच्या 230 जागा आहेत. येथे काँग्रेस आणि भाजपमध्ये थेट लढत होणार आहे. मात्र, येथे विरोधी आघाडीचे भागीदार समाजवादी पक्ष आणि आम आदमी पक्षही निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत. त्याचवेळी, राजस्थानमध्ये 200 जागांवर निवडणूक होणार आहे. राज्यात सत्ता परिवर्तनाची परंपरा फार पूर्वीपासून सुरु आहे. दुसरीकडे, के चंद्रशेखर राव यांच्या तेलंगणा सरकारला भाजप आणि काँग्रेसकडून आव्हान मिळू शकते. राज्यात एकूण 119 जागा आहेत. 90 जागा असलेल्या छत्तीसगडमध्ये भाजप पुन्हा सत्तेत येण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे दिसत आहे.
मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी सांगितले की, 5 राज्यांतील एकूण 16 कोटी मतदार या निवडणुकीत मतदान करणार आहेत. पाच राज्यांतील विधानसभेच्या एकूण 679 जागांवर मतदान होणार आहे. पहिल्यांदा मतदान करणाऱ्यांची संख्या सुमारे 60 लाख आहे. अरुण कुमार म्हणाले की, महिला मतदारांची संख्या सातत्याने वाढत आहे. पाच राज्यांमध्ये 7.8 कोटी महिला मतदार आहेत. तर पुरुष मतदारांची संख्या 8 कोटी आहे. जवळपास 60 लाख प्रथमच मतदार 5 राज्यांमधील निवडणुकीत भाग घेतील. तारखांमधील दुरुस्तीमुळे 15.39 लाख युवा मतदार निवडणुकीत भाग घेण्यास पात्र ठरले आहेत. तरुण मतदारांना प्रेरित करण्यासाठी 2900 हून अधिक मतदान केंद्रांचे व्यवस्थापन तरुणांकडून केले जाईल. 17,734 मॉडेल मतदान केंद्रे असतील, 621 मतदान केंद्रे PWD कर्मचारी व्यवस्थापित करतील, आणि 8,192 पीएस महिलांद्वारे व्यवस्थापित केली जातील. पाच राज्यांमधील आगामी विधानसभा निवडणुका 2023 साठी 679 विधानसभा मतदारसंघांमध्ये 1.77 लाख मतदान केंद्रे उभारली जाणार आहेत.