“मुख्यमंत्री केसीआर यांनी मेडीगड्डा धरण बांधकामात मोठा घोटाळा केला,” नक्षलवाद्यांचा पत्रकाद्वारे आरोप

0
9

गडचिरोली : तेलंगणा-महाराष्ट्र सीमेवरील मेडीगड्डा धरणावरील पुलाचे काही खांब खचल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. तेलंगणात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असल्याने मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्यावर विरोधी पक्षाने टीकेची झोड उठवली असताना या वादात आता नक्षल्यांनी उडी घेतली आहे. एक पत्रक काढून त्यांनी मुख्यमंत्री ‘केसीआर’ व त्यांच्या कुटुंबियांवर धरण बांधकामात मोठा घोटाळा केल्याचे आरोप केले आहे

तेलंगणात सद्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असल्याने मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्याविरोधात विरोधकांना आयते कोलीत मिळाले. यात आता नक्षलवाद्यांनी उडी घेतली असून त्यांनी तेलुगुतून एक पत्रक काढले आहे. समाजमाध्यमावर सार्वत्रिक झालेल्या या पत्रकात नक्षल्यांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखरराव यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहे. त्यांच्या कुटुंबीयांनी देखील या सिंचन प्रकल्पात मोठे कमिशन घेतल्याचेही म्हटले आहे. त्यामुळेच धरण बांधकामावेळेस पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. माध्यमांना देखील धमकवण्यात आले. आज या बांधकामाला तडे जात असल्याने घोटाळा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. भविष्यात यामुळे होणाऱ्या नुकसानीला मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव जबाबदार राहतील असेही पत्रकात नमूद आहे.