…तर ओबीसी महाराष्ट्रात पेटून उठेल- खासदार रामदास तडस

0
5

नागपूर : मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी आमचा विरोध नाही. मात्र जरांगे पाटील यांची ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षण द्या या मागणीला आमचा विरोध आहे. ओबीसीमधून आरक्षण दिले तर महाराष्ट्रात ओबीसी पेटून उठल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे अध्यक्ष व भाजपाचे खासदार रामदास तडस यांनी दिला.जवाहर वसतिगृहात प्रांतिक तैलिक महासभेची बैठक झाली. या बैठकीनंतर ते प्रसार माध्यमाशी बोलत होते. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी विरोध नाही. पण ओबीसीतून आमच्या अधिकारातून हे आरक्षण सरकारला देता येणार नाही, तसेच आम्ही गेल्या अनेक वर्षांपासून जातीनिहाय जनगणनेची मागणी करतो आहे. सरकारने जातीनिहाय जनगणना करावी म्हणजे ओबीसी किती आहे हे वास्तव समोर येईल. जरांगे पाटील यांच्या दबावात येऊन कुठलाही निर्णय सरकारने घेऊ नये. जरांगेनी टोकाची भूमिका घेऊ नये अन्यथा ओबीसी समाज शांत बसणार नाही. हा मुद्या या बैठकीमध्ये लावून धरण्यात आला आहे. तसेच त्या अनुषंगानेसुद्धा पावले सरकारने उचलावी अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच इतर महामंडळाप्रमाणे महाराष्ट्रातसुद्धा तेलघाणा महामंडळ स्थापण करावे असाही ठराव या बैठकीत घेण्यात आल्याचे तडस यांनी सांगितले.