गोंदिया –तालुक्यातील बिरसी येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ असून, या विमानतळावरील खंडित झालेली प्रवासी विमान वाहतूक सेवा लवकरच पूर्ववत होण्याच्या मार्ग पुन्हा मोकळा झाला आहे. येथून प्रवासी विमान वाहतूक सेवा सुरू करण्यास इंडिगो एअरलाइन्सने अनुकूलता दर्शविल्याची माहिती दोन महिन्यांपूर्वी पुढे आली होती. याकरीता खासदार प्रफुल पटेल यांनी पुढाकार घेतलेला होता.
इंडिगो कपंनीने विमानतळाची पाहणी करुन कंपनीने या अनुषंगाने कर्मचारी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. लवकरच बिरसी विमानतळावरून इंडिगो एअरलाइन्सचे विमान ‘टेक ऑफ’ करणार हे निश्चित झाले आहे.
बिरसी येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ असून, मागील वर्षी १३ मार्च २०२२ पासून या विमानतळावरून इंदूर – गोंदिया – हैदराबाद प्रवासी विमान वाहतूक सेवा सुरू झाली होती. मात्र, ही सेवा प्रवाशांसाठी औटघटकेचीच ठरली; सहा महिन्यांतच ती बंद झाली. त्यानंतर पुणे व मुंबईकरीता विमानसेवेची सातत्याने मागणी होती.गोंदिया पुणे हैद्राबाद इंदुर असा मार्ग हवा अशी मागणी होती.
इंडिगो कंपनी बिरसी विमानतळावरून ,हैदराबाद आणि इंदूर प्रवासी विमानसेवा सुरू करण्य़ाचा विचार करीत आहे. कदाचित डिसेंबर अखेरपर्यंत ही सेवा सुरू होऊ शकते.शुक्रवारला इंडिगोचे पथक पाहणी करुन गेले असून पूर्वप्रक्रिया सुरू असल्याचे भारतीय विमानपत्तन प्राधिकरण बिरसीचे व्यवस्थापक शफिक शाह यांनी बेरार टाईम्स’सोबत बोलताना सांगितले.