33.9 C
Gondiā
Monday, June 8, 2026
Home Top News जखणगावमध्ये जातगणना सुरू; महाराष्ट्रातील पहिले गाव जातनिहाय जनगणना करणार

जखणगावमध्ये जातगणना सुरू; महाराष्ट्रातील पहिले गाव जातनिहाय जनगणना करणार

0
116

blank

अहमदनगर -बिहार राज्यामध्ये झालेली जातगणना व तिच्या अहवालावरून उठलेले वादंग पाहता नगर जिल्ह्यातील एका गावानेही असे धाडस दाखवले आहे. नगर तालुक्‍यातील जखणगावने ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामसंसदेच्या 30 ऑक्‍टोबरला झालेल्या मासिक बैठकीत हा निर्णय घेतला व आज बुधवारपासून (1 नोव्हेंबर) जातगणना सुरू केली.तिचा अहवाल 9 नोव्हेंबरला राज्य सरकारला सादर केला जाणार आहे.

जखणगावचे लोकनियुक्त सरपंच डॉ. सुनील गंधे यांनी बैठकीत गावातील सर्व नागरिकांची जातनिहाय जनगणना करण्यासंदर्भात प्रस्ताव मांडला. मराठा आरक्षणासंबंधी तांत्रिक बाजूंची पूर्तता करण्यासाठी जातनिहाय गणना होणे आवश्‍यक असल्याचे म्हणणे त्यांनी मांडले. त्याला गावातील सेवा सोसायटीचे अध्यक्ष ऍड.बाळासाहेब कर्डिले यांनी अनुमोदन दिले व सर्व ग्रामस्थांनी हा ठराव सर्वानुमते संमत केला. मराठा आरक्षण व बदललेल्या परिस्थितीवर बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. गावातील सर्व जातीधर्माच्या लोकांनी मराठा आरक्षण आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी अनुकूलता दर्शवली.

जखणगावने राज्यात पहिल्यांदाच असे धाडस दाखवून जातनिहाय जनगणना करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. येत्या 9 दिवसात गावातील सर्व शासकीय, निमशासकीय कर्मचारी,मानधनावर काम करणारे सर्व सेवक व पदाधिकारी यांच्यामार्फत जनगणनेचे काम पूर्ण करण्यात येणार आहे व गुरुवारी 9 नोव्हेंबरला मुख्यमंत्री व मुख्य सचिवांना त्याचा अहवाल सादर केला जाणार आहे. दरम्यान, जातगणनेच्या कामात हयगय करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा व अडथळे निर्माण करणाऱ्या नागरिकांचा अहवाल ग्रामपंचायत कार्यालयाला सादर करण्याच्या सूचना डॉ. सुनील गंधे यांनी ग्रामसेवक व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत.

गावपातळीवर जातनिहाय असा सर्व्हे झाल्याने आरक्षण मुद्यातील वास्तव लक्षात येईल व भविष्यात देशाला एक निर्णायक पाऊल उचलावे लागेल तरच सामाजिक एकोपा टिकेल.
डॉ. सुनील गंधे,सरपंच, जखणगाव

blank