महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी ! ‘या’ सहा एक्सप्रेस गाड्यांचा वेग वाढणार

0
100

गोंदिया –वाढत्या लोकसंख्येमुळे देशातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था तोकडी ठरू लागली आहे.यामुळे आता सर्वसामान्यांसाठी रेल्वे वाहतूक आणि रस्ते वाहतूक सुधारण्यावर भर दिला जात आहे. या पार्श्वभूमीवर देशातील विविध मार्गांवर नव्याने रेल्वे चालवली जात आहे. नवीन लोहमार्ग तयार केले जात आहेत.

मध्य रेल्वेने गाड्यांचा वेग वाढावा यासाठी इगतपुरी – भुसावळ – बडनेरा यादरम्यान रूळाचे मजबुतीकरण, ओव्हर हेड वायरचे नूतनीकरण, प्रभावी सिग्नल यंत्रणा व इतर तांत्रिक कामें पूर्ण केली आहेत. यामुळे आता या मार्गावरील 6 एक्सप्रेस गाड्यांचा वेग वाढणार आहे.

या मार्गावरील मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते अमरावती, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते नागपूर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते हावडा, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते गोंदिया,छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते हजरत निजामुद्दीन राजधानी एक्सप्रेस, हावडा ते सीएसएमटी एक्सप्रेस या गाड्यांच्या स्पीडमध्ये वाढ होणार आहे. या गाड्या आता 130 किलोमीटर प्रति तास या वेगाने धावण्यास सक्षम राहतील असा दावा केला जात आहे.

या सहा एक्सप्रेस गाड्या तब्बल 130 किलोमीटर प्रति तास या वेगाने धावण्यास सक्षम होणार आहेत. अर्थातच, वंदे भारत एक्सप्रेसच्या ऑपरेशनल स्पीडप्रमाणे याही गाड्या धावतील असा आशावाद व्यक्त केला जात आहे.

मीडिया रिपोर्ट नुसार, इगतपुरी – भुसावळ विभाग (३०८.१२ किमी) आणि भुसावळ – बडनेरा विभाग (२१८.५३ किमी) असे एकूण ५२६.६५ किमी मार्गावर १३० किमी प्रतितास या वेगाने रेल्वेगाड्या धावू शकणार आहेत. मध्य रेल्वेने केलेल्या या महत्त्वाच्या कामामुळे या मार्गावरील राजधानी एक्सप्रेससह 6 एक्सप्रेस गाड्यांचा वेग वाढणार आहे.