जीवात जीव असेपर्यंत आरक्षणासाठी लढणार- विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार

0
4

जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे

ओबीसींच्या हक्काचे रक्षण करणार

सर्व समाजाला न्याय देण्याचे काम करू

जालना, दि. 18: ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये. ओबीसी समाजाचे आरक्षण टिकवणे सरकार आणि विरोधी पक्ष यांची सामूहिक जबाबदारी आहे. ओबीसींच्या हक्काचे रक्षण करण्याबरोबरच सर्व समाजाला न्याय देण्याचे काम आम्ही मिळून करू, जीवात जीव असेपर्यंत ओबीसी समाजाच्या आरक्षणासाठी लढणार,असा विश्वास देत जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली. मंचावर ओबीसी नेते व मंत्री छगन भुजबळ,विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार,आमदार गोपीचंद पडळकर,रासप प्रमुख महादेव जानकर,आमदार राजेश राठोड,मुस्लिम ओबीसी मोर्चाचे नेते शबीर अन्सारी,माजी आमदार आशिष देशमुख,माजी आमदार नारायणराव मुंढे,ओबीसी जनमोर्चा राष्ट्रीय अध्यक्ष व ओबीसी नेते माजी आमदार प्रकाश शेंडगे,प्राध्यापक टी.पी. मुंडे आदी मान्यवर उपस्थित ोते.

जालना जिल्ह्यातील अंबड येथे झालेल्या एल्गार सभेला संबोधित करताना श्री. वडेट्टीवार बोलत होते. यावेळी श्री. वडेट्टीवार भावूक झाले होते.श्री. वडेट्टीवार म्हणाले, आजची ही सभा पाहिल्यावर ओबीसींच्या हक्काला धक्का लावण्याची कोणाची हिंमत होणार नाही. ही ऐतिहासिक सभा आहे. ओबीसींच्या हक्कासाठी आम्ही लढत असताना कोणी धमक्या दिल्या तरी आम्ही लढत राहणार. पद येतील जातील. पदापेक्षा समाजातील उपेक्षित वर्गाला न्याय देणे महत्वाचे आहे.

मराठा समाजाला ओबीसमधून सरसकट आरक्षण देऊ नयेत या मागणीसाठी जालना जिल्ह्यातील अंबड येथे सभा होत आहे. यावेळी, मनोज जरांगे यांनी बालहट्ट सोडा, आमच्या हातात कोयता आहे, असे म्हणत ओबीसी नेते आक्रमक होतांना पाहायला मिळत आहे.तर, “राज्यातील सर्व वंजारी समाज कोयता घेऊन, छगन भुजबळ आणि विजय वडेट्टीवार यांच्या मागे आहे. त्यामुळे, जरांगे जास्त बोलू नका, आमच्या हातात कोयता आहे. लक्षात ठेवा रात्र वैऱ्याची आहे.  जरांगे नावच बाटूक आणि त्याच्या मागच्या लोकांना बघायचं आहे. त्यामुळे, भुजबळ यांच्या मागे ओबीसी समाज आहे,” असं प्राध्यापक टी पी मुंडे म्हणाले आहेत.

ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यावेळी बोलतांना म्हणाले की, “जरांगेंच्या सभेला तितक्यात तोला मोलाचं उत्तर दिलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभा पाहावी, एका सभेवरती आम्ही थांबणार नाही. राज्यातील प्रत्येक ठिकाणी अशीच सभा होईल. जरांगे सभा मोठी झाली म्हणजे आरक्षण मिळत नसतं. भुजबळांकडे या तुम्हाला ते आरक्षणाचा मार्ग दाखवतील. एक भुजबळ तुम्ही पाडाल तर, 160 मराठे आम्ही पाडू, असा इशारा यावेळी शेंडगे यांनी दिला. भुजभळ म्हातारे झाले असले, तरी सिंह आहेत. भुजबळ साहेब तुम्ही आदेश द्या ओबीसींची सत्ता आणल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. कुणब्यांचे दाखले देतायत ते ताबडतोब बंद करा, अन्यथा 24 च्या निवडणुकीत कुठे पाठवायचं हे ओबीस ठरवेल. पालावरच्या भटक्य़ा विमुक्तींच्या नोंदी का तपासल्या जात नाही, असेही शेंडगे म्हणाले.

लक्ष्मण गायकवाड म्हणाले की, विमुक्त भटके ओबीसी जोडा आणि प्रस्थापित मराठ्यांना पाडा. ईडा पीडा जाऊदे आणि ओबीसीचं राज्य येऊ द्या, आमच्या ताटात तुम्हाला जेऊ देणार नाही. ओबीसीचे राज्य आल्यावर तुमची गरिबी आम्ही दूर करू, पण आमच्या ताटात तुम्हाला जेवू देणार नाही. मराठ्यांची गरिबी 2024 ला ओबीसीचं राज्य आल्यावर दूर करू, असे लक्ष्मण गायकवाड म्हणाले.

रासप प्रमुख महादेव जानकर म्हणाले की, “ओबीसीचा जोपर्यंत पक्ष होत नाही, तोपर्यंत न्याय मिळणार नाही. जो पर्यँत ओबीसी समाजाचे पक्ष होत नाही, तोवर त्याला अर्थ राहत नाही. तर, काँग्रेस भाजपवाले तुम्हाला लुटून जातील असे जानकर म्हणाले आहे.

माजी आमदार आशिष देशमुख यावेळी बोलतांना म्हणाले की, ओबीसींना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी स्पष्ट केले आहे की, सरसकटचे दाखले मराठा समाजाला देता येणार नाही. ओबीसी आणि मराठा समाजात तेढ निर्माण करण्याचं काम मनोज जरांगे करत आहेत. त्यामुळे, मनोज जरांगे यांनी आपला बाल हट्ट सोडावा, असे देशमुख म्हणाले.

‘या’ आहेत प्रमुख मागण्या…

  • ओबीसी प्रवर्गात मराठा समाजाचा समावेश करु नये
  • बिहारच्या धर्तीवर राज्यात ओबीसींची जातनिहाय जनगणना करावी
  • मराठा समाजाला दिलेली खोटी कुणबी प्रमाणपत्रे रद्द करावी
  • खोटी बिंदू नामावली तयार करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी
  • 7 सप्टेंबर 2023 रोजीचा कुणबी प्रमाणपत्रे देण्याचा जीआर रद्द करावा
  • बंजारा समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करुन दाखल्यांचं वाटप करावं
  • धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करावी