जरांगेंच्या आंदोलनाची एसआयटी चौकशी करा! विधानसभा अध्यक्षांनी दिले आदेश

0
9

मुंबई : मराठा आरक्षणाच्या  मुद्द्यावरुन आक्रमक होत मनोज जरांगे पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले. यानंतर आज विधानसभेच्या अधिवेशनात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला. मनोज जरांगे यांच्या वक्तव्यावरून विधानसभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी झाल्याचं पाहायला मिळालं. याबाबत भाजपा आमदार आशिष शेलार यांनी जरांगेंच्या आंदोलनाची एसआयटी चौकशी करण्याची मागणी केली. ही मागणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मान्य केली असून एसआयटी चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

जरांगेंच्या आंदोलनावर बोलताना अशिष शेलार यांनी विधानसभेत म्हटलं की, कोपर्डी केसमधील आरोपींना कोर्टाच्या आवारात जाऊन मार हे सांगितलं गेलं, असा आरोप आहे. पिस्तुल कोणाकडे सापडली, लोकप्रतिनीधींची घर कोणी जाळली, याची चौकशी नको का? असा सवाल शेलार यांनी उपस्थित केला. यासोबत एसआयटी लावा, अशी मागणीही केली. याच्या मागे या सभागृहातील सदस्य कोण आहे याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी अमित साटम यांनीही केली.त्यानुसार विधानसभा अध्यक्षांनी जरांगेंच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी एसआयटी स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. हिंसा अथवा हिंसक वक्तव्य याला लोकशाहीत स्थान नाही. यासाठी योग्य उपाय योजना करण्याची जबाबदारी शासनाची आहे. याचं गांभीर्य लक्षात घेत शासनाने याची सखोल एसआयटी चौकशी करावी, असं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी म्हटलं.

फडणवीसांची पहिल्यांदाच जरांगे पाटलांवर प्रतिक्रिया
मनोज जरांगे पाटील यांनी गंभीर आरोप केल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्यांदाच मनोज जरांगे पाटील यांच्यावर प्रतिक्रिया दिली आहे. ”मला बोलायचं नव्हतं. मराठा समाजाच्या संदर्भात मी काय केलं हे महाराष्ट्राला माहीत आहे. मी मुख्यमंत्री असताना आरक्षण दिलं ते हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टात टिकवलं, सारथीला निधी शिष्यवृत्ती दिली, कर्ज दिले. मराठा समाज्यातल्या संदर्भात मला कोणाच्याही सर्टिफिकेटची गरज नाही. जरांगे पाटील माझ्यावर बोलले त्यानंतर मराठा समाज माझ्या पाठीशी उभा राहिला, त्यांच्यापाठीशी नाही”, असं फडणवीसांनी म्हटलं आहे.

पुढे ते म्हणाले, शिवाजी महाराजांचं नाव घ्याचचं आणि दुसऱ्यांना शिव्या द्यायच्या. लाठीचार्जच्या आधी मनोज जरांगे यांना परत कोणी आणलं? त्यांना घरी कोणं भेटलं? हे शोधायला हवं. आरोपी सांगत आहेत की, दगडफेक करायला सांगितलं गेलं. पोलीस आपले नाहीत का? समाजाला विघटीत करण्याचा प्रयत्न होतोय. त्यांना पैसे कोण देतेय? त्यांना मदत कोण करतंय? हे सर्व बाहेर येईल, असं फडणवीसांनी म्हटलं आहे.

देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं की, जर आयमाय काढणार असेल तर योग्य नाही. तुमच्या बदल जर कोणी बोलले तर, तुमच्या पाठीशी देवेंद्र फडणवीस राहतील. जरांगे पाटील यांच्या संदर्भात मला घेणं देणं नाही, मात्र त्यांचा बोलवता धनी कोण आहे हे शोधलं जाईल. औरंगाबाद या ठिकाणी वॉर रुम कोणी सुरु केली, याची सखोल चौकशी होईल, असंही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलं आहे.

मी पण सगळं उघड करतो : मनोज जरांगे
यावर मनोज जरांगे यांचीही प्रतिक्रिया आली आहे. ते म्हणाले की, “मी मराठ्यांचे काम करतोय. ते सत्तेचा वापर करणारे आहेत. देवेंद्र फडणवीस हे आशिष शेलार यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून गोळी चालवणार आहेत. न्यायचं त्या तुरुंगात घेऊन जा, चौकशी लावा. मला सगळ्यात जास्त फोन तुमचेच आले आहेत. कॉलवर काय काय बोललेत मी पण उघड करतो. आता म्हणाले तर मी सलाईन उचलून चौकशीला येतो, असे जरांगे म्हणाले आहेत.