मनसे नेते अविनाश जाधवांविरोधात 5 कोटींच्या खंडणीचा आरोप;गुन्हा दाखल

0
5

ठाणे:- सराफाकडे पाच कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी ठाणे मनसे अध्यक्ष अविनाश जाधव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. मनसे नेते अविनाश जाधव यांच्यासह दोघांविरोधाल लोकमान्य टिळक मार्ग पोलिसांनी खंडणी, मारहाण व कट रचल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शैलेश जैन (55) असे तक्रारदार सराफाचे नाव आहे. मात्र, तक्रार दाखल झाल्यानंतर सूड भावनेने आपल्याविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे अविनाश जाधव यांनी म्हटले.

मिळालेल्या माहितीनुसार, सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी शैलेश जैन यांनी वैभव ठक्कर याला झवेरी बाजार येथील जे. के. ज्वेलर्स या कार्यालयात हिशोबासाठी बोलावले होते. त्यावेळी मनसे नेते अविनाश जाधव त्यांचे सहकारी, अंगरक्षक व सहा ते सात व्यक्तींनी पोलिसांसमोर जैन यांचा मुलगा सौमिल याला मारहाण केली. यावेळी जाधव यांनी उचलून नेण्याची व नुकसान करण्याची धमकी देऊन जैन यांना पाच कोटी रुपयांसाठी धमकावल्याचा आरोप करत पोलीसात तक्रार दाखल केली.सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी शैलेश जैन यांच्या तक्रारीनंतर वैभव ठक्कर व अविनाश जाधव यांच्याविरोधात भादंवि कलम 385, 143, 147, 323, 120ब अंतर्गत पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

दरम्यान, सराफाच्या तक्रारीनंतर अविनाश जाधव यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत अविनाश जाधव यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सूड भावनेने आपल्याविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे सांगितले. तसेच, एका व्यक्तीने फोन करून मला व माझ्या पत्नीला डांबून ठेवले आहे, असे सांगितले होते. मी पोलिसांसह तेथे गेलो होतो, असे जाधव यांनी सांगितले.