अहमदनगरमध्ये प्रवरा नदीत धुळ्याच्या तीन अधिकाऱ्यांचा बुडून मृत्यू

0
10

अहमदनगर,दि.२३ः येथील प्रवरा नदीत बुडालेल्या दोघा युवकांचा शोध घेण्यासाठी SDRF पथकाचे जवान रेस्क्यू करीत असतानाच बचाव पथकातील बोट उलटून तीघांचा बुडून मृत्यू झाला. इतर बेपत्ता असल्याने त्यांचे शोधकार्य सुरु आहे. या अपघतात धुळे एसडीआरएफ बलगट क्रमांक सहाचे पोलीस उपनिरीक्षक प्रकाश शिंदे, पोलिस शिपाई वैभव वाघ व पोलीस शिपाई राहुल पावरा हे तिघे अधिकारी मृत्यू पावले आहेत. पंकज पंढरीनाथ पवार, अशोक हिम्मतराव पवार कॉन्स्टेबल या दोघांना बाहेर काढण्यात आले.गणेश मधुकर देशमुख (वाकचौरे) आणि अर्जुन रामदास जेडगूले हे मात्र अद्याप बेपत्ता असून त्यांचा शोध घेतला जात आहे.

पाण्यात बुडालेल्या तरुणांचा शोध घेण्यासाठी जवान गेले होते. तेच बुडून मृत्यू पावल्याने पंचक्रोशीत मोठी हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, ही घटना नेमकी कशी घडली? पोहण्यात तरबेज असलेल्या जवानांना पाण्याबाहेर का येत आले नाही याबाबत प्राथमिक माहिती समोर आली आहे. प्रत्यक्षदर्शींनी जे सांगितले ते ऐकून सर्वांच्या अंगावर शहरे आले.

सुगाव गावाचे पोलीस पाटील राजेंद्र शिंदे यांनी प्रवरा नदीत SDRF जवानांची बोट बुडाल्याचा थरार कथन केला. ते याचे प्रत्यक्षदर्शी आहेत. राजेंद्र शिंदे म्हणाले, नदीपात्रात बुडालेल्या तरुणांचा शोध घेण्यासाठी सकाळी ६ वाजता SDRF चे पथक आलेले होते व त्यांनी साडेसहा वाजेच्या सुमारास शोधमोहिम सुरू केली होती. ते नदीत शोध घेत होते.

SDRF टीमच्या दोन बोटी होत्या व त्या तरुणांचा शोध घेत होत्या. पण दुर्दैवाने अचानक यातील एक बोट पाण्याच्या भोवऱ्यात सापडून ही बोट पलटी झाली. त्यादरम्यान दुसरी बोट पाण्यात चकरा मारत होती व इकडे बुडालेल्या बोटीतील जवान पोहण्याचा प्रयत्न करत जीव वाचवण्याचा प्रयत्न करत होते.पण पाण्याच्या भोवऱ्यात अडकल्यामुळे त्यांना वर येता येईना व दुसरी बोट तेथे मदतीसाठी जाण्याआधीच सगळे बुडाले असल्याची माहिती शिंदे यांनी दिली.